
*किशोरवयीन जीवन कौशल्य शिक्षण कार्यक्रमांतर्गत शिक्षकांचे एचआयव्ही/एड्स व लैंगिक आरोग्य प्रशिक्षण संपन्न*
गडचिरोली, दि. २० (जिमाका) : जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली यांच्या वतीने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २० ऑगस्ट २०२५ रोजी शालेय शिक्षक व शिक्षिका यांचे विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. हे प्रशिक्षण किशोरवयीन जीवन कौशल्य शिक्षण कार्यक्रम (Adolescent Education Programme – AEP) अंतर्गत घेण्यात आले असून, यामध्ये ८ वी, ९ वी आणि ११ वी इयत्तेला विज्ञान विषय शिकवणाऱ्या शिक्षकांचा सहभाग होता.
या उपक्रमाचा प्रमुख उद्देश म्हणजे किशोरवयीन वयोगटातील (१० ते १९ वर्षे) विद्यार्थ्यांमध्ये एचआयव्ही/एड्सचा प्रतिबंध आणि लैंगिक आजारांविषयी योग्य माहिती पोहोचवून संसर्गाचा प्रसार कमी करणे हा आहे. शालेय शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या जीवन घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात, म्हणून त्यांना विषयाचे प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याचे या प्रसंगी सांगण्यात आले.
प्रशिक्षणादरम्यान विविध महत्त्वपूर्ण बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले. त्यामध्ये –
किशोरवयीन जीवन कौशल्य शिक्षण कार्यक्रमाची (AEP) ओळख
किशोरावस्था आणि वाढते वय
पौंगाडावस्थेतील प्रजननक्षम आणि लैंगिक आरोग्य
मानसिक आरोग्य समस्या आणि मादक पदार्थांचा दुरुपयोग
एचआयव्ही/एड्स व एसटीआय/आरटीआय विषयी मूलभूत माहिती
एचआयव्ही/एड्स प्रतिबंधासाठी जीवन-कौशल्य
एचआयव्ही/एड्स (प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम – २०१७
तसेच प्रशिक्षणानंतर जागृतीसाठी माहितीपर IEC साहित्यही शिक्षकांना देण्यात आले.
या प्रशिक्षण सत्राला महेश भांडेकर (DPO), डॉ. अभिषेक गव्हारे (CSO) – जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक अधिकारी, नागेश मादेशी (ICTC समुपदेशक) यांच्यासह मोठ्या संख्येने शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते.