संबंधित पोलीस ठाण्याने दारूविक्रेत्यांवर तडीपारीच्या कारवाईसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश.
गडचिरोली:- जिल्हयातील होलसेल दारू विक्रेते व वारंवार कारवाई होऊनही ते दारू विक्री करतात, अशा दारूविक्रेत्यांवर तडीपारीची कारवाई करण्यात येईल. त्यासाठी संबधित पोलिस ठाण्यांच्या वतीने दारूविक्रेत्यांवर तडीपारीच्या कारवाईसाठी प्रस्ताव सादर करावे, अशा सूचना पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी दिल्या.
गडचिरोली येथील पोलिस अधिक्षक कार्यालयात १२ सप्टेंबर रोजी मुक्तिपथ अभियान व पोलीस विभागाच्या समन्वयातून होणाऱ्या कामाची आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मुक्तिपथचे सहसंचालक संतोष सावळकर, दारूबंदी पथकाचे प्रमुख उल्हास भुसारी तसेच सर्व तालुका
स्तरावरील ठाण्याचे पोलिस निरीक्षक व मुक्तिपथचे तालुका संघटक उपस्थित होते.
तालुक्यातील किती गावात सध्या दारू विक्री बंद आहे, पोलिस प्रशासना द्वारे तालुक्यातील काही गावात चांगले कामे केले गेले, यासोबतच इतर गावात बंदीसाठी कुठे सहकार्य आवश्यक आहे याची मांडणी मुक्तिपथ तालुका संघटकाने सदर बैठकीत केली.बैठकीचे प्रास्ताविक व सांगता उल्हास भुसारी यांनी केली.
अहवाल सादर करण्याचे आदेश
सर्व माहितीची नोंद घेत त्वरित कारवाई करण्याचे व अहवाल सादर करण्याचे आदेश उपस्थित सर्व पोलिस निरीक्षकांना पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी दिले.