
“राखी विथ खाकी” उपक्रम.
पेरमिली(गडचिरोली):– उप पोलीस स्टेशन पेरमिली यांच्या वतीने दिं. 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन, रक्षाबंधन आणि हरितवृक्ष मोहीम या उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात पेरमिली गावात जनजागृती रॅली काढून झाली. रॅलीत पोलीस कर्मचारी, सीआरपीफ व एसआरपीफ जवान, शाळेतील विद्यार्थी, शिक्षकवृंद आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. रॅलीदरम्यान आदिवासी संस्कृतीचे जतन, शिक्षणाचे महत्त्व आणि भाऊ-बहीण स्नेहबंधाचे मूल्य या विषयांवर घोषवाक्ये देऊन जनजागृती करण्यात आली.
यानंतर शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, पेरमिली येथे विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि रेला नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमधून आपली सर्जनशीलता व कलागुण उत्तमरीत्या सादर केले. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचा विशेष आकर्षण होता “राखी विथ खाकी” हा उपक्रम. यात विद्यार्थिनींनी उपस्थित पोलीस बांधवांना राखी बांधून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
तसेच उप पोलीस स्टेशन परिसरात हरितवृक्ष मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. पोलीस अधिकारी, जवान, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची झाडे लावून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
या कार्यक्रमाला मुख्याध्यापक माऊलीकर, अधीक्षक भोये, पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी दीपक सोनुने, पोलीस उप निरीक्षक महाजन, सीआरपीफ चे सिंग, पीएसआय कुटे, जिल्हा पोलीस, सीआरपीफ व एसआरपीफ चे जवान, तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना कायदा-सुव्यवस्था, शिक्षणाचे महत्त्व, पर्यावरण संवर्धन आणि आदिवासी संस्कृतीचे जतन याबाबत मार्गदर्शन केले.
उप पोलीस स्टेशन पेरमिली तर्फे या कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवर, शाळा प्रशासन, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे आभार मानण्यात आले.