
स्टील उत्पादन, हजारो रोजगार आणि कोटी वृक्षांची लागवड – गडचिरोलीच्या विकासाला नवी दिशा!
निलिमा बंडमवार
मुख्य संपादिका
इंद्रावती विदर्भ टाइम्स
गडचिरोली:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज गडचिरोली येथे ‘लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड’च्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन व पायाभरणी करण्यात आले. यावेळी त्यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत गडचिरोलीच्या औद्योगिक, पर्यावरणीय आणि सामाजिक प्रगतीच्या वाटचालीची सविस्तर माहिती दिली.
ग्रीन स्टील क्लस्टरच्या माध्यमातून चीनपेक्षा दर्जेदार आणि कमी किमतीचे स्टील तयार करण्याचे उद्दिष्ट असून, 20,000 नव्या रोजगारांच्या संधी निर्माण होणार आहेत. लॉयड्स कंपनीमध्ये आज 14,000 स्थानिक युवक-युवती कार्यरत असून, काही महिलांनी हाऊसकीपिंग पासून सुरुवात करून वॉल्वो ट्रक ड्रायव्हर म्हणून ₹55,000 प्रती महिना पगार मिळवला आहे.
राज्यातील पहिली व देशातील चौथी 80 किमी स्लरी पाइपलाइन, ई-व्हेईकल्स आधारित वाहतूक आणि ग्रीन ट्रान्सपोर्टसह पर्यावरणपूरक उपाययोजना राबवण्यात येत आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात 2 वर्षांत 1 कोटी वृक्षारोपणाचे लक्ष्य असून, त्यातील 40 लाख वृक्षांची लागवड आजपासून सुरू झाली. लॉयड्समार्फत स्थानिकांसाठी शाळा, रुग्णालय, कामगारांना भागधारक बनवण्याचा निर्णय, तसेच गोंडवाना व कर्टिन विद्यापीठांतर्गत मायनिंग अभ्यासक्रमही सुरू करण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, गडचिरोली हा जिल्हा पुढील 5 वर्षांत दरडोई उत्पन्नामध्ये राज्यातील पहिल्या 10 जिल्ह्यांमध्ये असेल, हा विश्वास आहे.
यावेळी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार डॉ. मिलींद नरोटे, आमदार परिणय फुके, आमदार धर्मरावबाबा आत्राम, पद्मश्री श्रीमती तुलसी मुंडा व इतर मान्यवर उपस्थित होते.