🟥 रेती लिलाव प्रक्रियेत संगनमताचा आरोप; नव्याने लिलाव घेण्याची मागणी
गडचिरोली | प्रतिनिधी
गडचिरोली जिल्ह्यातील रेती लिलाव प्रक्रियेत संगनमत झाल्याचा गंभीर आरोप करत नव्याने लिलाव प्रक्रिया राबविण्याची मागणी करण्यात आली आहे. आदर्श समाज विकास सेवा संस्था, पोरला यांच्या वतीने जिल्हाधिकारी गडचिरोली यांना याबाबत निवेदन देण्यात आले.
संस्थेचे प्रतिनिधी योगाजी कुडवे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, गडचिरोली जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी रेत घाटांचा लिलाव करण्यात आला होता. मात्र दिनांक ४ मार्च २०२६ रोजी गडचिरोली, वडसा आणि चामोर्शी उपविभागातील काही रेत घाटांचे लिलाव अत्यंत कमी दराने झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली उपविभागात सुमारे ६३५ रुपये प्रति ब्रास, वडसा उपविभागात १५०० रुपये प्रति ब्रास तर चामोर्शी उपविभागात २००० रुपये प्रति ब्रास दराने लिलाव करण्यात आला. हा दर अत्यंत कमी असल्याने शासनाला मोठ्या प्रमाणात महसुली नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
याउलट शेजारच्या चंद्रपूर जिल्ह्यात रेत घाटांचा लिलाव सुमारे ५००० रुपये प्रति ब्रास दराने झाल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील लिलाव प्रक्रियेत संगनमत झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
यापूर्वी अहेरी उपविभागातील काही रेत घाटांच्या लिलावातही संगनमत झाल्याच्या तक्रारीनंतर तो लिलाव रद्द करून फेरलिलाव घेण्यात आला होता. त्यावेळी शासनाला अधिक महसूल प्राप्त झाला होता.
त्यामुळे दिनांक ४ मार्च २०२६ रोजी झालेल्या सर्व रेत घाटांच्या लिलाव प्रक्रिया रद्द करून नव्याने पारदर्शक पद्धतीने फेरलिलाव घेण्यात यावा, अशी मागणी संस्थेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांनाही पाठविण्यात आली आहे.
