स्वास्थ्य, स्वावलंबन आणि समृद्धी समवेत सक्षम गडचिरोली!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अहेरी येथील महिला व बाल रुग्णालयाचे लोकार्पण संपन्न.
अहेरी(गडचिरोली):– अहेरी येथील महिला व बाल रुग्णालयाच्या लोकार्पणामुळे स्त्रीरोग उपचार, प्रसूती सेवा, बालकांच्या आजारांवर उपचार आणि एनआयसीयूची सुविधा अशा सर्व आधुनिक वैद्यकीय सेवा इथे उपलब्ध होत आहेत. महिला, बालकांचे आरोग्य, तसेच कुपोषणावर उपाययोजना करण्यासाठी ही सुविधा अत्यंत महत्त्वाची आहे. या रुग्णालयाचा लाभ केवळ अहेरीला नव्हे तर आसपासच्या सर्व तालुक्यांना मिळणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजाच्या शेवटच्या स्तरावरील व्यक्तीपर्यंत आरोग्यसुविधा पोहोचवण्यासाठी ‘आयुष्मान आरोग्य मंदिर’ ही संकल्पना मांडली. भामरागड, सिरोंचा, एटापल्ली, चामोर्शी, मुलचेरा, धानोरा, कोरची आणि कुरखेडा येथील ब्लॉक पब्लिक हेल्थ यूनिट्सचे (आयुष्मान आरोग्य मंदिरांचे) लोकार्पण झाले. त्यामुळे गडचिरोलीच्या आरोग्य व्यवस्थेत आजचा दिवस एक महत्वपूर्ण बदल घडवणारा आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
आरोग्य सेवा मजबूत होत असताना स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण व्हायला हव्यात. गडचिरोलीत मोठ्या प्रमाणावर उद्योग उभे राहत असून, यामुळे निर्माण होणारे रोजगार स्थानिक भूमिपुत्रांनाच मिळावेत. सद्यस्थितीत 80% पेक्षा अधिक रोजगार स्थानिक युवकांना मिळाले असून पुढील काळात लाखो रोजगार निर्माण होतील. यामुळे गडचिरोलीतील जनजीवन मोठ्या प्रमाणात बदलताना आपण पाहणार आहोत, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
यावेळी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार डॉ. मिलींद नरोटे, आमदार धर्मरावबाबा आत्राम व इतर मान्यवर उपस्थित होते.
