
*गाव समजून घेण्यासाठी रासेयो शिबिराची भूमिका महत्त्वाची !*
*- आमदार रामदास मसराम*
*कोरची:- जितेंद्र सहारे*
ग्रामीण भागातील जनतेला अनेक समस्यांना तोंड देत जीवन जगावे लागत आहे. या समस्या सोडविण्यासाठी त्या आधी समजून घेणे गरजेचे आहे आणि जोपर्यंत प्रत्यक्ष जनतेत आपण मिसळणार नाही तोपर्यंत त्या समस्या समजून घेता येत नाहीत. राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी गावातील प्रत्यक्ष समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे मत आरमोरी विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार रामदास मसराम यांनी केले. टेमली येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, निरोगी जीवन हिच खरी संपत्ती असून त्यासाठी पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध होणे अतिशय आवश्यक आहे. अशुद्ध पाणी प्यायल्याने ग्रामीण भागातील जनतेला अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोरची तालुक्यात कोणत्याही मोठ्या नदी, तलाव व धरणे नसल्याने पावसाचे बहुतांश पाणी वाहून जाते. ते अडवून जमिनीत मुरविण्यासाठी आता गावागावाने पुढाकार घ्यावा असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले. या परिसरात मी शिक्षक म्हणून काम केलेले असल्यामुळे मला या क्षेत्रातील समस्यांची जाणीव आहे. जरी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार नसले तरी या समस्या सोडविण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी याप्रसंगी स्पष्ट केले.
सविस्तर वृत्त असे की, कोरची येथील वनश्री कला व विज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवशीय विशेष शिबीर टेमली येथे आयोजित करण्यात आले आहे. इंदिरा शिक्षण संस्था आरमोरी चे अध्यक्ष बाबासाहेब भातकुलकर यांच्या अध्यक्षतेखाली या शिबिराचा उद्घाटन समारंभ पार पडला. यावेळी विशेष अतिथी म्हणून माजी कृषी अधिकारी श्याम धाईत, तर प्रमुख अतिथी म्हणून पुढारी न्यूज गडचिरोली चे जिल्हा प्रतिनिधी आशिष अग्रवाल, प्राचार्य डॉ. जयदेव देशमुख, सरपंच निकाबाई थाट, मुख्याध्यापक कैलास नुरुटी, उपसरपंच धनिराम हिडामी, देशीरबाई घाटघुमर, बेदरामजी थाट, ग्रामसेवक डी एस भोयर,जितेंद्र सहारे,नामदेवराव मेश्राम,नरेश सोनकुकरा, मदन करसी, रंजित बागडेहरिया, बरगटकर सर आदी उपस्थित होते. महात्मा गांधी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, व गाडगे महाराज यांच्या प्रतिमांपुढे दीपप्रज्वलन व प्रतिमांचे पुजन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात गोंडवाना विद्यापीठ गीताने करण्यात आली.
यावेळी इंदिरा शिक्षण संस्था आरमोरी, टेमली येथील ग्रामपंचायत कार्यालय, सार्वजनिक बाल गणेश मंडळ, महानुभाव पंथ मंडळ, महिला बचत गट, पुरुष बचत गट, जि. प. मराठी प्राथमिक शाळा, वनश्री महाविद्यालय कोरची व अन्य अशा विविध संस्थांकडून उद्घाटक नवनिर्वाचित आमदार रामदास मसराम यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबासाहेब भातकुलकर व विशेष अतिथी श्याम धाईत यांचाही शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन महाविद्यालतर्फे सत्कार करण्यात आला.
अध्यक्षिय मार्गदर्शन करतांना बाबासाहेब भातकुलकर म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासासाठी संधी उपलब्ध करून देणारी आणि समाजाप्रती असलेल्या उत्तरदायित्त्वाची जाणीव विकसित करणारी योजना आहे. प्रारंभी शिबिरात सहभागी होण्यासाठी आढेवेढे घेणारे विद्यार्थी शिबिरातून जातांना अक्षरशः रडत असतात, याचे कारण या शिबिरादरम्यान त्यांचे गावाशी जुळलेले नातेसंबध दृढ होणे हे असते. या गावात शिक्षक म्हणून सेवा देणारे शिक्षक आज विद्यमान आमदार आहेत. या गावात ग्रामसेवक म्हणून सेवा देणारे आता संवर्ग विकास अधिकारी आहेत या दृष्टीने हे गाव भाग्यशाली आहे, असे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
यावेळी उपस्थित अतिथी आशिष अग्रवाल, श्याम धाईत, धनिराम हिडामी यांनीही मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थी विकासाला सामाजिक परिमाण मिळवून देणारी योजना आहे. विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा, सामाजिक समरसता इत्यादी मूल्यांचा विकास व्हावा यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन या शिबिरात करण्यात आले आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयदेव देशमुख यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रदिप चापले यांनी तर आभार प्रदर्शन रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ व्ही टी चहारे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, टेमली येथील विविध बचत गटाच्या महिला व पुरुष, विविध संघटनांचे पदाधिकारी व सदस्य, मराठी प्राथमिक शाळेतील सर्व कर्मचारी, ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचारी, टेमली येथील समस्त ग्रामवासी, रासेयो स्वयंसेवक व विद्यार्थी विद्यार्थीनी यांनी मौलिक सहकार्य केले.