गडचिरोली:- अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवाची बाजी लावून नक्षल्यांशी दोन हात करणाऱ्या गडचिरोली पोलीस दलातील १७ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतींचे शौर्य पदक जाहीर झाले आहे, तर एका पोलीस अधिकाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक घोषित झाले.स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ही घोषणा करण्यात आली.त्यामुळे जिल्हा पोलीस दलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
देशभरातील पोलीस दलात तसेच सशस्त्र दलात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना स्वातंत्र्य दिनानिमित्त सन्मानित केले जाते.यावर्षी सुद्धा राष्ट्रपतींनी देशभरात एकूण २०८ पोलीस शौर्य पदक व ६२४ गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक जाहीर केले असून, त्यापैकी गडचिरोली पोलीस दलास १७ शौर्य पदक व गुणवत्तापूर्ण सेवेसाठी एक पदक जाहीर झाले आहे.यामध्ये गडचिरोलीत अपर पोलीस अधीक्षक म्हणून सेवा बजावलेले व सध्या वाशिमचे पोलीस अधीक्षक असलेले अनुज तारे, उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, सहायक निरीक्षक राहुल देव्हडे, उपनिरीक्षक दीपक औटे, विजय सपकाळ, हवालदार महेश मिच्चा, कोतला कोरामी,नागेशकुमार मादरबोईना, समय्या आसम,महादेव वानखेडे,विवेक नरोटे, मोरेश्वर पोटावी, अंमलदार कोरके वेलादी, कैलास कुळमेथे, शकील शेख, विश्वनाथ पेंदाम यांना राष्ट्रपतींचे पोलीस शौर्य पदक मिळाले असून, उपनिरीक्षक मधुकर नैताम यांना राष्ट्रपती यांचे गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक मिळाले आहे. शहीद उपनिरीक्षक धनाजी होनमाने यांना मरणोत्तर शौर्य पदक जाहीर झाले आहे.