
पोळ्याच्या दिवशी नदीघाटावर पोलिसांची नाकेबंदी; 42 हजाराचा दंड.
अहेरी(गडचिरोली):– अहेरी पासून तीन किलोमीटर अंतरावरील गुडेम येथे दारू पिण्यासाठी वांगेपली नदी घाटावरील पुलीयावरून जावे लागते. बैलपोळ्याच्या दिवशी सुट्टी असल्याने बऱ्याच तडीरामानि सायंकाळच्या वेळेस आपला मोर्चा गुडेम कडे वळविला. मात्र त्या ठिकाणी एसडीपीओ अजय कोकाटे यांच्या उपस्थितीत नाकेबंदी करून वाहनांची तपासणी असल्याने अनेकांचे धाबे दणाणले. रात्री उशिरापर्यंत सदर कार्य चालल्याने 22 दुचाकी व चारचाकी वाहनांना त्यांच्याकडे नाकेबंदी दरम्यान नसलेल्या वाहणाच्या कागदपत्रामुळे 42 हजाराचा दंड बसविण्यात आला.
नाकेबंदी दरम्यान वाहतूक परवाना,सीआरसी पुस्तक, हेल्मेट इत्यादी बाबी वाहन धारकांकडून तपासून घेण्यात येत होत्या. दररोज प्रमाणे आजही नदी घाटावर कोणीच नसेल या आशेने बऱ्याच वाहन धारकांकडे कागदपत्रे नव्हती. परिणामी 22 वाहनधारकांना 42 हजार रुपयांचा दंड बसविण्यात आला.
तसेच तीन वाहनधारकांवर ड्रंक अँड ड्राईव्हची केस तपासणीनंतर लावण्यात आल्याची माहिती आहे. यावेळी पोलीस निरीक्षक हर्षल एकरे, कॉन्स्टेबल पूजा पाटील व इतर पोलीस कर्मचारी कर्तव्यावर कार्यरत होते.