बरसेवाडा- चंदनवेली रस्त्याची दयनीय अवस्था; नागरिकांचे प्रचंड हाल, तात्काळ दुरुस्तीची जोरदार मागणी
बरसेवाडा ते चंदनवेली अवघ्या चार किलोमीटरचा महत्त्वाचा दळणवळणाचा रस्ता गेल्या नऊ ते दहा वर्षांपासून अत्यंत खराब व दुर्लक्षित अवस्थेत आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून आजतागायत या मार्गाचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात आलेले नाही. परिणामी हा रस्ता प्रत्यक्ष वापरण्यायोग्य राहिलेला नाही.
रस्त्याची अवस्था इतकी दयनीय झाली आहे की, या मार्गाने प्रवास करणे धोकादायक ठरत आहे. त्यामुळे बरसेवाडा व चंदनवेली परिसरातील नागरिकांना फक्त 4 किमीच्या अंतरासाठी 15 ते 20 किलोमीटरचा अतिरिक्त मार्ग वापरून जिल्ह्याच्या दिशेने जावे लागत आहे. या अनावश्यक फेऱ्यामुळे नागरिकांचा वेळ, पैसा व इंधनाचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे.
या रस्त्यावरून विद्यार्थी, शेतकरी, रुग्ण, कामगार तसेच ग्रामस्थांची दररोज मोठ्या प्रमाणात ये-जा असते. मात्र खड्ड्यांनी भरलेला रस्ता, चिखल व तुटलेली डांबरीकरण यामुळे वाहनांचे सातत्याने नुकसान होत आहे. विशेषतः पावसाळ्यात परिस्थिती आणखी भयावह बनते, तेव्हा हा रस्ता अक्षरशः बंद अवस्थेत जातो.
या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे रुग्णवाहिका, आपत्कालीन सेवा व इतर अत्यावश्यक वाहने वेळेत पोहोचू शकत नाहीत, ही बाब अत्यंत गंभीर असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. छोट्या अंतरासाठी मोठा फेरा मारावा लागत असल्याने आरोग्य, शिक्षण व शेतीशी संबंधित कामांवरही विपरीत परिणाम होत आहे.
या समस्येबाबत ग्रामस्थांनी अनेक वेळा संबंधित प्रशासनाकडे तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
बरसेवाडा ते चंदनवेली मार्गावरील ग्रामस्थ व नागरिकांची एकमुखी व ठाम मागणी आहे की या रस्त्याचे तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करून तो वाहतुकीस योग्य करण्यात यावा. अन्यथा प्रशासनाने लवकरात लवकर दखल न घेतल्यास, नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे.
नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंधित असलेल्या या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून प्रशासनाने आपली जबाबदारी पार पाडावी, अशी जोरदार मागणी संपूर्ण परिसरातून होत आहे.
