
गडचिरोली:- राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ उपप्रादेशिक कार्यालय कुरखेडाअंतर्गत येत असलेल्या आदिवासी विविध कार्यकारी संस्था देऊळगाव केंद्रावर धान आणि बारदाना खरेदीत दीड कोटींचा घोटाळा झाल्याचे समोर आल्यानंतर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी गंभीर दखल घेत गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. त्यामुळे घोटाळेबाजांचे धाबे दणाणले आहे.
आदिवासी विविध कार्यकारी संस्था देऊळगाव खरेदी केंद्रावर १ कोटी ५३ लाखांचा गैरव्यावहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी प्रादेशिक व्यवस्थापक सोपान सांबरे यांनी देऊळगाव खरेदी केंद्रावर भेट दिली असता त्यांना २०२३-२४ हंगामात खरेदी करण्यात आलेले धान आणि बारदान्याविषयी संशय निर्माण झाला. त्यांनी चौकशी समितीमार्फत तपासणी केली असता कागदावर असलेल्या १९८६० क्विंटल धान आणि ४९७५१ बारदान्यात ३९४४ क्विंटल धान व १४१४८ बारदान्याची तफावत आढळली.