दुर्गम भागातील शाळांना नवसंजीवनी; काटेलवार सरांचा राज्यस्तरावर भव्य गौरव
गडचिरोली–नाशिकमधील आदिवासी शाळांचा कायापालट; लोकसहभागातून उभारल्या डिजिटल शाळा
पुणे, दि. 29 मार्च 2026 :
गडचिरोली व नाशिक जिल्ह्यातील आदिवासी आणि अतिदुर्गम भागातील शाळांना नवसंजीवनी देत शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाळवी येथील शिक्षक श्रीकांत गटय्या काटेलवार यांचा पुण्यात राज्यस्तरावर भव्य आणि दिमाखदार सोहळ्यात गौरव करण्यात आला.
पुण्यातील ग. दि. माडगूळकर सभागृहात पार पडलेल्या या सोहळ्यात शिक्षण क्षेत्रातील मान्यवर दत्तात्रय वारे गुरुजी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन काटेलवार सरांचा सत्कार करण्यात आला. या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
गेल्या १६ वर्षांपासून काटेलवार सरांनी दुर्गम भागातील शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणत तब्बल चार शाळांचा कायापालट केला आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे शाळांच्या पटसंख्येत लक्षणीय वाढ झाली असून लोकसहभाग व लोकवर्गणीतून शाळांना नवे रूप प्राप्त झाले आहे.
नवोपक्रमशीलतेत प्राविण्य मिळवत त्यांनी विविध शैक्षणिक प्रयोग राबवले. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांच्या नृत्यकलेचा वापर करत त्यांनी तब्बल १६ लाख रुपयांचा निधी उभारून डिजिटल शाळा उभारण्याचा अभिनव उपक्रम यशस्वी केला. शिक्षण आणि कला यांचा संगम घडवत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली.
काटेलवार सरांच्या कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावरही घेण्यात आली असून त्यांनी अनेक राष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये सहभाग नोंदवला आहे. त्यांच्या शाळेतील उपक्रमांची दखल राज्य विधानसभेत घेण्यात आली असून शाळेच्या प्रगतीबद्दल विशेष शाबासकी मिळाली आहे. याशिवाय, वाळवी शाळेवर आधारित व्हिडिओ डॉक्युमेंटरीची निर्मितीही महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवणे, शाळा गळती थांबवणे आणि शिक्षणाबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण करणे यामध्ये त्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या कार्यामुळे आदिवासी व दुर्गम भागातील शिक्षणाला नवी दिशा मिळाली आहे.
या उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरावर झालेल्या सन्मानामुळे गडचिरोली आणि नाशिक जिल्ह्याचा मान उंचावला असून सर्व स्तरांतून काटेलवार सरांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
