डिजिटल पत्रकारितेला नवे नेतृत्व — इकबाल शेख प्रदेश उपाध्यक्ष
गडचिरोली | जिल्हा प्रतिनिधी
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी एटीव्ही न्यूज मराठीचे संपादक इकबाल शेख यांची एकमुखी निवड करण्यात आली आहे. कोल्हापूर येथे संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष राजा माने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
इकबाल शेख यांना पत्रकारिता क्षेत्रातील तब्बल २८ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश विभागात त्यांनी वरिष्ठ पत्रकार म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे. पत्रकारितेतील विविध प्रश्न, अडचणी आणि समस्यांवर त्यांनी सातत्याने ठोस भूमिका घेत पत्रकारांसाठी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
देशातील डिजिटल क्षेत्रातील अग्रगण्य संघटनांपैकी एक असलेल्या डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे जाळे महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात विस्तारलेले आहे. संघटनेच्या विस्तार आणि बळकटीसाठी इकबाल शेख यांचे संघटनात्मक कौशल्य महत्त्वाचे ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
त्यांच्या निवडीबद्दल राजकीय, सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. डिजिटल माध्यमांच्या वाढत्या प्रभावाच्या काळात त्यांच्या नेतृत्वामुळे संघटनेची ताकद अधिक वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
नव्या जबाबदारीबाबत प्रतिक्रिया देताना इकबाल शेख यांनी पत्रकारांच्या कल्याणासाठी आणि सुरक्षिततेसाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
