
नागपूर:- नागपूरची इंटरनॅशनल मास्टर दिव्या देशमुखनं फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकाचा अंतिम सामना जिंकून विश्वचषक आपल्या नावावर केला आहे.
तिने गेल्या 23 जुलैला फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक दिली होती. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे.जॉर्जियामधील बाटुमी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताच्याच कोनेरू हंपीने विजय मिळवला होता. त्यामुळे, या अंतिम लढतीत दोन्ही खेळाडू भारताच्याच होत्या.
उपांत्य लढतीतल्या दुसऱ्या फेरीत दिव्यानं चीनची माजी वर्ल्ड चॅम्पियन झोंगयी टॅन हिला हरवत फायनलमध्ये प्रवेश केला होता.उपांत्य फेरीचा पहिला डाव बरोबरीत सुटल्यावर दिव्यानं पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना दबावाखाली न येता शानदार कामगिरी बजावली होती.याबरोबरच दिव्या आता 2026 मध्ये होणाऱ्या महिला कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे तसंच तिनं आपला पहिला ग्रँडमास्टर नॉर्मही मिळवला आहे.
दिव्या देशमुखची बक्षीस रक्कम!
दिव्या आणि हम्पी दोघांनाही या प्रवासासाठी चांगली बक्षीस रक्कम मिळाली आहे. जेतेपद जिंकल्याबद्दल दिव्या देशमुखला 42 लाख रुपयांची बक्षीस रक्कम मिळाली आहे.
तिच्यासोबत उपविजेत्या असलेल्या हम्पीलाही 30 लाख रुपयांची बक्षीस रक्कम मिळाली आहे. दोन्ही खेळाडूंनी प्रतिष्ठित ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.
दिव्या देशमुख नेमकी कोण आहे?
दिव्या देशमुख ही मूळची नागपूरची असून तिचा जन्म 9 डिसेंबर 2005 ला झाला. तिचे वडील जितेंद्र आणि आई नम्रता हे दोघेही डॉक्टर आहेत. ती भवन्स सिव्हिल लाइन्स शाळेची विद्यार्थिनी असून लहानपणापासूनच ती बुद्धिबळ खेळण्यात पारंगत आहे.
इंटरनॅशनल मास्टर नॉर्म मिळवलेली दिव्या ऑगस्ट (2023) महिन्यात ज्युनिअर खेळाडूंमध्ये मुलींमध्ये जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू बनली. त्यावेळी तिची रेटिंग 2472 झाली होती.
दिव्याला 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय मास्टर, 2021 मध्ये महिला ग्रँडमास्टर, 2018 मध्ये महिला आंतरराष्ट्रीय मास्टर आणि 2013 मध्ये महिला FIDE म्हणजेच इंटरनॅशनल चेस फेडरेशनकडून दिली जाणारी मास्टर पदवी मिळाली आहे.