जितेंद्र सहारे कोरची प्रतिनिधी
*कोरची – कुरखेडा रस्त्यावरील घाटावर अपघाताची मालिका सुरूच*
*मालवाहू ट्रक रिव्हर्स आल्याने एकाचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी*
*कोरची :-* तालुका मुख्यालयापासून 8 किलोमीटर अंतरावर 6 किलोमीटरचे मोठे वळणी घाट असून मागील काही दिवसांपासून सदर घाट हे अपघाताचे माहेरघर झाल्याचे दिसून येत आहे. सकीर्ण रस्ता व वळणी घाट आणि त्यातच जड वाहनांची सतत ये – जा यामुळे या मार्गावर सतत अपघाताची मालिका सुरू झाल्याचे दिसून येत आहे. अपघातामुळे कित्येकदा सदर मार्ग मार्गक्रमणासाठी बंद असतात ज्यामुळे याचा फटका छोटे वाहन चालक तसेच रुग्णवाहिका सारखे आपातकालीन सेवा देणाऱ्यांना बसत असल्याचे बहुतेकदा दिसून आले आहे.
कुरखेडा मार्गे छत्तीसगडला लोखंडी साहित्य घेऊन जाणारा ट्रक क्रमांक CG 07 BE 5718 हा वळणी घाटावर अनियंत्रित होऊन रिवर्स आल्यामुळे साधारणतः 50 मीटर दुरीवर असलेल्या दोन दुचाकी या ट्रक खाली दबल्या गेल्या. प्रचंड वेगाने ट्रक रिव्हर्स येत असल्याचे निदर्शनास येतात दोन्ही दुचाकी स्वारांनी उडी घेतली परंतु दोन्ही दुचाकी मध्ये असलेल्या चार लोकांपैकी एक सुखरूप बाहेर पडाला परंतु तिघांना गंभीर दुखापत झाली.
यामध्ये MH 33 E 6350 क्रमांकाच्या दुचाकीने कोरची मार्गे जाणाऱ्या दोन्ही जखमींना खाजगी वाहनाच्या सहाय्याने तातडीने पुराडा येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले तर CG 04 KF 1854 क्रमांकाच्या दुचाकीने कोरची कडे जाणाऱ्या मोहगाव येथील दया फुलकुवर वय (अंदाजे 35) याला 108 रुग्णवाहिकेच्या सहाय्याने ग्रामीण रुग्णालय कोरची येथे भरती करण्यात आले परंतु प्रकृती बिघडत असताना त्याला पुढील उपचारासाठी घेऊन जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक ट्रक सुरूच ठेवून घटनास्थळावरून पसार झाला पुढील तपास पुराडा पोलीस करत आहेत.
*रस्त्याच्या कडेला मुरमाचा भरणा नाही*
कोरची – कुरखेडा मार्गावर सहा किलोमीटरचे मोठे वळणी घाट असून रस्ता अरुंद असल्याने दोन वाहनांना मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागत असून रस्त्याच्या कडेला मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून हे सुद्धा अपघाताचे कारण असल्याचे दिसून येत आहे. परंतु याकडे संबंधित विभाग पूर्णपणे दुर्लक्ष करीत असून या अपघाताला ते सुद्धा तितकेच जबाबदार असून त्यांच्यावर सुद्धा मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मृतकांच्या नातेवाईकांनी केली आहे.
