*जारावंडी पोलीसांची धडक कारवाई : मोठ्या प्रमाणात गोवंश तस्करीचा पर्दाफाश; मुख्य आरोपी फरार*
एटापल्ली
जारावंडी पोलीस स्टेशनच्या पथकाने केलेल्या अचूक आणि संयमी कारवाईत तब्बल २४ लाख ९० हजार रुपये किमतीच्या गोवंश तस्करीचा भंडाफोड करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान मुख्य संशयित आरोपी मात्र अंधाराचा फायदा घेत पसार झाले असून त्यांचा शोध पोलीस विभाग घेत आहेत
प्राप्त माहितीनुसार, २२ नोव्हेंबर च्या रात्रीपासून ते २३ नोव्हेंबरच्या पहाटेपर्यंत पोलीस पथक विशेष गस्त घालत असताना जारावंडी पासून 12 किमी अंतरावर असलेल्या रोपी गावाच्या जंगल परिसरात दोन संशयित वाहने दिसून आली एक बोलेरो पिकअप TS 20 T 6061 आणि एक मोठा ट्रक TS 12 UA 0789
वाहनांची तपासणी केली असता दोन्ही वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात गोवंश भरून बेकायदेशीररीत्या वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले. सर्व जनावरे ताब्यात घेऊन सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आली असून जप्त जनावरांची एकूण किंमत २४,९०,००० रुपये इतकी असल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी फरार आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र प्रमुख आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध पोलिस घेत आहेत
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षकांसह पथकाने घटनास्थळी धाव घेत वाहनांसह सर्व जनावरे ताब्यात घेऊन पुढील तपास जलदगतीने सुरू केला आहे.जारावंडी पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील गोवंश तस्करीच्या घटनांना मोठा प्रतिबंध मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
*सीमावर्ती आदिवासी भागात वाढती तस्करी; पोलीस निरीक्षक राहुल आव्हाड यांच्या धडक कारवायांनी गुन्हेगारीला मोठा आळा*
छत्तीसगड सीमेलगत असल्यामुळे जारावंडी परिसरातील आदिवासी बहुल गावांमध्ये तस्करीची समस्या सातत्याने डोके वर काढत असते. दुर्गम जंगल भाग, कमी वर्दळ असलेले मार्ग आणि सीमावर्ती भागाचा फायदा घेत काही व्यक्ती गोवंश तस्करी, सुगंधित तंबाखू, देशी–विदेशी दारूची अवैध वाहतूक अशा गैरप्रकारांना चालना देत असल्याचे वारंवार समोर येते. या भागात अनेक वर्षांपासून विविध प्रकारच्या तस्करीचे जाळे सक्रिय आहेत
अशा परिस्थितीत जारावंडी पोलीस स्टेशनचे निरीक्षक राहुल आव्हाड हे आपल्या धाडसी, आक्रमक आणि तत्पर कारवाईसाठी विशेष ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत. आव्हाड यांनी पदभार स्वीकारल्यानंतर परिसरातील अवैध हालचालींवर सतत छापे, गस्त आणि गुप्त तपास मोहिमा राबवून बेकायदेशीर कामांवर प्रभावी नियंत्रण मिळवले. त्यांच्या कारवायांमुळे अनेक तस्करांचे धाबे दणाणले असून गैरकृत्यांमध्ये गुंतलेल्या टोळ्यांना आपल्या हालचाली थांबवाव्या लागत आहेत.
गोवंश तस्करीच्या अलीकडील प्रकरणासोबतच भूतकाळातही आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक प्रकरणांवर निर्णायक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वात झालेल्या कारवायात या संवेदनशील भागांमध्ये प्रभावी नियंत्रण ठेवत गुन्हेगारीला रोखण्याचे सातत्यपूर्ण प्रयत्न केले आहेत.
दरम्यान, स्थानिक नागरिकांकडून दारू, सुगंधित तंबाखू आणि इतर बेकायदेशीर वस्तूंच्या तस्करीवर आणखी कडक, नियमित आणि व्यापक कारवाई करण्याची मागणी वाढत आहे. नागरिकांना अपेक्षा आहे की पोलीस प्रशासनाच्या या प्रयत्नांमुळे परिसरातील अवैध व्यवसायांवर पूर्णविराम मिळेल आणि सीमावर्ती आदिवासी भाग अधिक सुरक्षित बनेल.
