गडचिरोली:- छत्तीसगड सीमेकडील कोपर्शीच्या जंगलात सोमवारी सकाळी उडालेल्या चकमकीत ठार झालेल्या पाचही नक्षलवाद्यांची ओळख पटली आहे. त्यात तीन महिला आणि दोन पुरूष नक्षलींचा समावेश आहे. विशेष म्हणजे त्यात प्रत्येकी 16 लाखांचे इनाम असलेले दोन डीव्हीसीएम पदावरील वरिष्ठ कॅडर आहेत. त्यातील सावजी ऊर्फ अंकलु दसरु तुलावी (65 वर्ष) याच्यावर तब्बल 226 गुन्हे दाखल आहेत. त्यात 84 चकमकी आणि 54 खुनाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. तो धानोरा तालुक्यातील गुरेकसाचा रहिवासी होता. सध्या तो नक्षलवाद्यांच्या पुरवठा विभागात कार्यरत होता.
सदर चकमकीत गडचिरोली पोलीस दलाचे जवान कुमोद प्रभाकर आत्राम हे जखमी झाले आहेत. त्यांना दोन गोळ्या लागल्या. त्यामुळे अभियाना दरम्यान त्यांना हेलीकॉप्टरच्या मदतीने तातडीने बाहेर काढून छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात लँड करून उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर आहे. विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंसक कारवाया करण्याचा माओवाद्यांचा प्रयत्न होता. तो गडचिरोली पोलिसांनी हाणून पाडला. त्यामुळे आता ही निवडणूक शांततेत पार पडेल असा विश्वास पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी व्यक्त केला.
या कारवाईनंतर माओवाद विरोधी अभियानाचे अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) सुनील रामानंद, विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षल अभियान) संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक (अभियान) अजयकुमार शर्मा आदींनी गडचिरोलीत भेट देऊन या घटनेची सविस्तर माहिती जाणून घेऊन पुढील रणनितीबाबत मार्गदर्शन केले.
सी-60 पथकासह सीआरपीएफचा सहभाग
निवडणुकीत हिंसक कारवाया करण्यासाठी तीन ते चार दिवसांपासून काही माओवादी एकत्र येऊन तयारी करत असल्याची माहिती गडचिरोली पोलिसांना मिळाली होती. छत्तीसगड सिमेलगतच्या भामरागड तालुक्यातील कोपर्शीच्या जंगलात दोन वेगवेगळ्या ठिकाणी हे माओवादी तळ ठोकुन होते. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख व अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम.रमेश यांच्या नेतृत्वात गडचिरोली पोलीस दलातील विशेष अभियान पथकाच्या 21 तुकड्या आणि सीआरपीएफ क्युएटीच्या 2 तुकड्या रवाना करण्यात आल्या.
दि.21 ला सकाळी 7 वाजताच्या सुमारास जंगलात दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी जवानांना जीवे ठार मारण्याच्या व हत्यार लुटण्याच्या उद्देशाने जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार सुरु केला. जवानांनी प्रत्युत्तरादाखल व स्वरंक्षणासाठी माओवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांचा वाढता दबाव पाहून माओवाद्यांनी घनदाट जंगलात पळ काढला. त्यानंतर जंगलात शोधमोहीम सुरू करण्यात आली. 72 तास चाललेल्या या अभियानात जवळपास 8 तास फायरिंग सुरू होती.
सर्वांवर मिळून 38 लाखांचे इनाम
ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये जया ऊर्फ भुरी पदा (31 वर्ष) या कंपनी नं.10 च्या डिव्हीसीएमचा समावेश आहे. तिच्यावर चकमकीचे 31, जाळपोळीचे 3, खुनाचे 4 आणि इतर 11 असे 49 गुन्हे दाखल आहेत. सावजी ऊर्फ अंकलु दसरु तुलावी याच्यावर चकमक, जाळपोळ, खुनासह एकूण 226 गुन्हे असून त्याच्यावरही 16 लाखांचे इनाम होते. इतर मृतांमध्ये देवे ऊर्फ रिता (25 वर्ष), बसंत आणि सुखमती या दलम सदस्यांचा समावेश आहे. त्यांच्यावर एकूण 38 लाखांचे इनाम होते. घटनास्थळावरुन 5 रायफलींसह इतर साहित्य हस्तगत करण्यात आले.
तीन वर्षात 85 माओवाद्यांना संपविले
सन 2021 पासून गेल्या तीन वर्षात गडचिरोली पोलिसांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे 85 कट्टर माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. 109 माओवाद्यांना अटक करण्यात आली आहे. 37 माओवाद्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. आता गडचिरोली जिल्ह्याच्या हद्दीत जेमतेम 50 सशस्र माओवादी शिल्लक आहेत. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी या भागात माओवादविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले असून पुन्हा एकदा सर्व माओवाद्यांना आत्मसमर्पण करुन आपले जीवनमान उंचाविण्याचे आवाहन केले आहे.