कुरखेडा (गडचिरोली):- जिह्यातील चातगाव वनपरिक्षेत्रांतर्गत कुरखेडा गावाजवळच्या शेतात काम करीत असलेल्या एका महिलेला 6 डिसेंबर रोजी दुपारी पावणेचार वाजताच्या सुमारास वाघाने ठार केले. त्या ठार झालेल्या महिलेचे नाव शारदा महेश मानकर (२६) रा. कुरखेडा, ता. गडचिरोली असे आहे. शारदाला एक ३ वर्षांचा मुलगा असून ती ८ महिन्यांची गर्भवती होती, अशी माहिती आहे.
मानकर यांचे शेत कुरखेडा गावापासून दीड किलोमीटर अंतरावर असून, ते खंड क्रमांक ४११ मधील जंगलाला लागून आहे. मानकर यांच्या शेतातील धानाचे चुरणे नुकतेच आटोपले. त्यामुळे खळ्यावर राहिलेले धान गोळा करण्यासाठी शारदा मानकर ही शेतावर गेली होती. धान पाखळत असताना दबा धरुन बसलेल्या वाघाने तिच्यावर हल्ला केला. यात ती जागीच गतप्राण झाली. तिच्या ओरडण्याचा आवाज येताच शेजारच्या शेतातील महिला धावून आल्या. मात्र, तोपर्यंत वाघाने पोबारा केला.
घटनेनंतर चातगावचे वनपरिक्षेत्राधिकारी आणि अन्य कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. संध्याकाळी उशिरा मृतदेह गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आला. त्या परिसरात वाघाचा वावर असून, दवंडी देऊन नागरिकांना आधीच सतर्क करण्यात आले आहे, असे वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांनी सांगितले.