पोलिसांनी दोन आरोपींना केली अटक.
चामोर्शी(गडचिरोली):- पार्टी करण्यासाठी कोंबडा दिला नाही म्हणून पुतण्याला अमानुष मारहाण केली.यामध्ये त्याचा मृत्यू झाल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेहवर पेट्रोल टाकून पेटविला. मात्र, मृतदेह अर्धवट जळाला. ही थरारक घटना दि. ६ नोव्हेंबरला चामोर्शी तालुक्याच्या सोमनपल्ली गावात घडली. अवघ्या २४ तासांत या प्रकरणाला उलगडा करून पोलिसांनी चुलत काकासह दोघांना बेड्या ठोकल्या. मनोज आनंदराव मेकर्तीवार (वय ३२, रा. सोमनपल्ली, ता. चामोर्शी) असे मृताचे नाव आहे. सचिन मेकर्तीवार (वय ३५, रा. सोमनपल्ली) व राहुल गुंजेकर (३४, रा. चिंचाळा जि. चंद्रपूर) यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.
सचिन हा मनोजचा चुलत काका आहे. मनोज मजुरीकाम करायचा. तो ६ रोजी दुपारी घरी होता. तीन वाजता त्याच्याकडे सचिन मेकर्तीवार व राहुल गुंजेकर आले. त्यांनी मनोजला त्याच्याकडे असलेला कोंबडा पार्टी करण्यासाठी मागितला. मात्र, मनोजने तो देण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांना राग आला.त्यांनी मनोजला पकडून गावातील शंकर पुप्पलवार याच्या घरी नेले व तेथे लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर दोघेही घाबरून गेले.त्यांनी त्याचा मृतदेह दुचाकी वरून येनापूर रस्त्यालगतच्या नाल्याजवळ नेला. त्यानंतर गावात जाऊन पेट्रोल आणले आणि त्याचे कपडे काढून त्याच्या अंगावर काड्या व कपडे टाकून जाळून टाकले त्यामध्ये मृतदेह अर्धवट जळाला. रस्त्यालगत काही तरी पेटले असल्याचे कळाल्यावर गावकऱ्यांनी धाव घेतली तेव्हा राहुल मेकर्तीवारचा मृतदेह आढळला. गावकऱ्यांनी ही माहिती पोलिस ठाण्यात कळवली. मनोजच्या मागे आई-वडील, लहान भाऊ, पत्नी, ९ व ७ वर्षे वयाच्या दोन मुली असा परिवार आहे. याप्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आष्टी ठाण्याचे पोलिस निरीक्षक विशाल काळे हे तपास करत आहेत.