*भामरागडमध्ये कृषी विभाग व पाणी फाउंडेशनचा उपक्रम, गट शेतीला चालना*
अविनाश नारनवरे भामरागड तालुका प्रतिनिधी……
भामरागड : गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भामरागड तालुक्यात आज कृषी विभाग आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शेतकरी मार्गदर्शन बैठक उत्साहात संपन्न झाली. तालुक्यातील विविध गावांमधून आलेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या बैठकीला अहेरी उपविभागाचे उपविभागीय अधिकारी तथा भामरागड तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी श्री कुणाल राऊत उपस्थित होते. त्यांनी अध्यक्षस्थान स्वीकारत शेतकऱ्यांशी संवाद साधताना गटशेतीचे महत्त्व, खर्चातील बचत व आधुनिक पिक पद्धतींबाबत मार्गदर्शन केले. पाणी फाउंडेशनचे रीजनल समन्वयक भूषण कडू आणि कृषी विभागातील विविध अधिकारी देखील या बैठकीस उपस्थित होते.
बैठकीदरम्यान पाणी फाउंडेशनचे भूषण कडू आणि अभिजीत गोडसे यांनी “फार्मर कप स्पर्धा 2026” या राज्यव्यापी उपक्रमाची माहिती सविस्तरपणे दिली. त्यांनी सांगितले की, एकट्या शेतकऱ्याला येणाऱ्या अडचणी गटशेतीमुळे मोठ्या प्रमाणात कमी होतात आणि शेतमाल उत्पादनात लक्षणीय वाढ साधता येते. या स्पर्धेद्वारे खर्च कमी करणे, उत्पादन वाढवणे व शाश्वत शेतीला चालना देणे हे पाणी फाउंडेशनचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 2026 मध्ये महाराष्ट्रातील 351 ग्रामीण तालुक्यांमध्ये ही स्पर्धा आयोजित होणार असून, जिल्हास्तर आणि राज्यस्तरावर आकर्षक बक्षिसांची तरतूद राहणार आहे.
भामरागड तालुक्यातील शेतकऱ्यांनी या स्पर्धेत गटशेतीच्या माध्यमातून सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले. उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी तालुक्यातून जास्तीत जास्त शेतकरी गट तयार होण्यासाठी कृषी विभाग पूर्ण सहकार्य करेल, असे सांगत शेतकऱ्यांचा सहभाग वाढवण्याची ग्वाही दिली.
दुर्गम भागातही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची झालेली उपस्थिती व त्यांच्या प्रश्नांना मिळालेले सकारात्मक प्रतिसाद यामुळे ही बैठक यशस्वी ठरली.
