दैनिक देशोन्नतीच्या बातमीचा प्रभाव: प्रशासनाची तत्काळ दखल, चामोर्शी–आष्टी हायवेवरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू…
तालुका प्रतिनिधी
चामोर्शी: चामोर्शी–आष्टी हायवेवरील वाढत्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल होत होते तसेच अपघातांची शक्यता वाढत होती. “चामोर्शी–आष्टी हायवेवर खड्डे वाढल्याने अपघाताला आमंत्रण” या मथळ्याखाली दैनिक देशोन्नतीमध्ये बातमी प्रकाशित होताच प्रशासन तात्काळ हालचालीस आले. आज सकाळपासून संबंधित विभागाने हायवेवरील खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात केलेली आहे.
हायवेवरील खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त झाले होते. अनेक ठिकाणी खोल खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावत होता आणि दुर्घटना घडण्याची शक्यता वाढली होती. स्थानिक नागरिकांनी व माध्यमांनी यावर सातत्याने लक्ष वेधूनही काम सुरू होत नसल्याने सर्वत्र नाराजी होती.
मात्र दैनिक देशोन्नतीने याबाबतची बातमी प्रमुखता देताच प्रशासन झोपेतून जागे झाले असून तत्काळ दुरुस्तीची प्रक्रिया हाती घेण्यात आली. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पथकाने आज कामाला सुरुवात केली. काही महत्त्वाच्या ठिकाणी खड्डे बुजविण्याचे काम वेगाने सुरू असून उर्वरित भागाचे काम टप्प्याटप्प्याने करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.
नागरिकांनी माध्यमांच्या भूमिकेचे स्वागत केले असून प्रशासनाने अशा समस्यांकडे नियमितपणे लक्ष द्यावे, अशी मागणी व्यक्त केली आहे.
