
हातात तिरंगा आणि ओठांवर देशभक्तीच्या घोषणा… मोठ्या जल्लोषात पेरमिलीत निघाली हर घर तिरंगा रॅली.
तिरंग्याच्या गौरवासाठी एकत्र – जिल्हा पोलीस, सीआरपीएफ व आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची भव्य रॅली.
पेरमिली(अहेरी):- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देशभक्तीच्या रंगात न्हालेलं पेरमिली गाव, हातात तिरंगा आणि ओठांवर देशभक्तीच्या घोषणा… अशा जल्लोषात ‘हर घर तिरंगा’ रॅलीचे आयोजन करण्यात आले.
जिल्हा पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), स्थानिक आश्रम शाळेतील विद्यार्थी व गावकऱ्यांच्या सहभागामुळे रॅलीला भव्य स्वरूप लाभले.या रॅलीत सीआरपीएफ चे कमांडंट महेंद्र कुमार, पोलीस निरीक्षक रणजीत सिंह, पेरमिली पोस्टे प्रभारी अधिकारी दीपक सोनुने, पोलीस उपनिरीक्षक महाजन, सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बंडमवार, जिल्हा पोलीस व CRPF चे जवान, शाळेतील शिक्षकवृंद, विद्यार्थी तसेच पेरमिली गावचे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सकाळी गावातील मुख्य मार्गावरून तिरंगा हातात घेऊन रॅली निघाली. ‘वंदे मातरम’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमला. देशभक्तीपर गीतांच्या तालावर रॅलीने जनजागृती करत प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचा संदेश दिला.
रॅली पाहण्यासाठी गावातील नागरिक मोठ्या संख्येने रस्त्याच्या कडेला उभे होते. अनेकांनी हातात तिरंगा घेऊन रॅलीचे स्वागत केले. काहींनी सांगितले की, अशा उपक्रमांमुळे देशभक्तीची भावना आणखी दृढ होते आणि मुलांना प्रेरणा मिळते.
अभियानाचा हेतू
‘हर घर तिरंगा’ अभियानाचा मुख्य उद्देश प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये राष्ट्रध्वजाबद्दल आदर, एकात्मतेची भावना आणि अभिमानाची जाणीव निर्माण करणे हा आहे. या उपक्रमातून १५ ते १७ ऑगस्ट दरम्यान प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचा संकल्प गावकऱ्यांनी केला.