संस्कार पब्लिक स्कूल, एटापल्ली येथे युवा दिनानिमित्त भव्य वार्षिक स्नेहसंमेलन
एटापल्ली | प्रतिनिधी
संस्कार पब्लिक स्कूल, एटापल्ली येथे युवा दिनाचे औचित्य साधून शाळेचे भव्य वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात पार पडले. या कार्यक्रमाचे उद्घाटन एटापल्ली नगर पंचायतच्या नगराध्यक्षा श्रीमती रेखाताई मोहूर्ले यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास पालक, शिक्षक, विद्यार्थी तसेच शहरातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमप्रसंगी बोलताना संस्कार संस्थेचे संस्थापक श्री विजय संस्कार यांनी सांगितले की, “आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पुस्तकी शिक्षण पुरेसे नाही. विद्यार्थ्यांचा क्रीडा, नाट्य, अभिनय, संचालन, नेतृत्वगुण आणि सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास व्हावा, यासाठी संस्कार पब्लिक स्कूल सातत्याने कार्यरत आहे. ज्ञानासोबत संस्कार आणि आत्मविश्वास असलेली सक्षम पिढी घडविणे हेच शाळेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.”
या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आधारित आकर्षक व रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. मोबाईलच्या दुष्परिणामांवर आधारित प्रभावी नाट्यछटा, ९० च्या दशकातील नृत्यशैली, देशभक्तीपर गीतनृत्य, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यावर आधारित सादरीकरण तसेच भारतातील विविध राज्यांच्या लोककलेचे सादरीकरण यामुळे संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध झाले. विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणातून सामाजिक संदेश व देशप्रेम प्रभावीपणे मांडले.
या स्नेहसंमेलनाचे विशेष आकर्षण म्हणजे संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व संचालन पूर्णतः विद्यार्थ्यांनीच केले. तसेच शाळेच्या माजी विद्यार्थ्यांची प्रेरणादायी मनोगते स्क्रीनद्वारे प्रदर्शित करण्यात आली, ज्यामुळे नवोदित विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीसाठी नवी दिशा व प्रेरणा मिळाली.
कार्यक्रमानंतर पालकांनी समाधान व्यक्त करत सांगितले की, “आमच्या पाल्यांचा शालेय शिक्षणासोबतच सर्वांगीण विकास होत आहे, हे पाहून आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो.” विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडविणारी शाळा म्हणून संस्कार पब्लिक स्कूल, एटापल्ली यांचे परिसरात मोठे नावलौकिक असल्याचेही पालकांनी नमूद केले.
संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण, प्रेरणादायी व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला असून विद्यार्थ्यांच्या बहुआयामी कौशल्यांचे दर्शन घडविणारे हे वार्षिक स्नेहसंमेलन सर्व उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरले.
