
दोन तरुणांना वाचविण्यात यश तर सहा युवक अजूनही बेपत्ताच.
गडचिरोली:- गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या तेलंगणा राज्यातील सीमावर्ती भागात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. गोदावरी नदीच्या पात्रात अंघोळीसाठी गेलेले 8 जण बेपत्ता झाले आहे. या 8 युवकांपैकी 2 जणांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे. मात्र 6 जण पाण्यात बेपत्ता झाले आहेत. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणातील अंबडपल्ली भागात संध्याकाळी 6.30 च्या सुमारास ही घटना घडली. अंबडपल्ली येथील गोदावरी नदीच्या पात्रात हे आठ युवक अंघोळीसाठी गेले होते. मात्र, गोदावरी नदीत पाण्याचा प्रवाह जास्त होतो. या तरुणांना प्रवाहाचा अंदाज आला नाही. त्यामुळे वाहत्या पाण्यात ते वाहून गेले. हे सर्व बेपत्ता युवक 20 वर्षांखालील आहेत.
सहा युवक अजूनही बेपत्ताच.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेतली. स्थानिकांच्या प्रयत्नांमुळे दोन युवकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र, उर्वरित सहा युवकांचा अजूनही पत्ता लागलेला नाही. बेपत्ता झालेल्या युवकांचा शोध घेण्यासाठी गोदावरी नदीच्या काठावर शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बेपत्ता झालेल्या युवकांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
बेपत्ता झालेल्यांची नावे.
पत्ती मधुसूदन (१५)
पत्ती मनोज (१३)
कर्नाळा सागर (१४)
तोगरी रक्षित (११)
पांडू (१८)
राहुल (१९)
नातेवाईकांचा आक्रोश.
या घटनेनंतर मुलांचे नातेवाईक आणि त्यांच्या कुटुंबियांनी गोदावरी नदीकाठी गर्दी केली. बुडालेली ही मुले सुखरुप परत यावीत, अनेकजण प्रार्थना करत होता. यावेळी काळीज पिळवटणाऱ्या आक्रोशामुळे परिसर सुन्न झाला.