
एकाचवेळी १० हजारांची पदभरती हा ऐतिहासिक निर्णय : उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई:- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १० हजारांहून अधिक उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आल्याबद्दल अभिनंदन करत, हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातील ऐतिहासिक दिवस ठरल्याचे सांगितले. त्यांनी सांगितले की शासनाने अनुकंपा तत्त्वावरील सुमारे ८० टक्के प्रलंबित प्रकरणे निकाली काढली असून भरती प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणि वेग यावर विशेष भर देण्यात आला आहे. शासनाने तांत्रिक आणि प्रशासकीय अडथळे दूर करून अनेक कुटुंबांना दिलासा दिला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “प्रत्येक फाईल, प्रत्येक नागरिक आणि प्रत्येक निर्णयामागे एक जिवंत कथा असते. त्यामुळे पारदर्शकता, जबाबदारी आणि निष्ठा हे तीन शब्द प्रत्येक कर्मचाऱ्याचे मार्गदर्शक असले पाहिजेत.” नवनियुक्त कर्मचाऱ्यांना त्यांनी ई-गव्हर्नन्सचा वापर वाढवण्याचे, लोकाभिमुख कारभार करण्याचे आणि प्रामाणिकपणे जबाबदाऱ्या पार पाडण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “२०४७ पर्यंत विकसित भारत” या स्वप्नपूर्तीसाठी विकसित महाराष्ट्र घडवण्याचे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
यावेळी २० उमेदवारांना प्रातिनिधीक स्वरुपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र वितरीत करण्यात आले.
यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या (सेवा) अपर मुख्य सचिव व्ही.राधा यांचा पदभरती प्रक्रिया गतीमान पध्दतीने राबविल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्य रोजगार मेळाव्याला दिलेल्या शुभेच्छांचे वाचन मुख्य सचिव यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य सचिव राजेश कुमार यांनी केले, आभार कोकण विभागीय आयुक्त विजयकुमार सुर्यवंशी यांनी मानले.