
*’अपार आयडी’बाबत संभ्रम; पालकांच्या गैरसमजांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान*
_________________________________
*एटापल्ली*
आदिवासीबहुल आणि नक्षलप्रभावित भागात विद्यार्थ्यांची स्वतंत्र डिजिटल ओळख निर्माण करण्यासाठी शिक्षण विभागाकडून ‘अपार आयडी’ प्रकल्प राबविण्यात येत आहे. मात्र, या प्रकल्पावरून मोठ्या प्रमाणात अफवा आणि गैरसमज पसरत असल्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक दोघेही अडचणीत आले आहेत. पालकांकडून या प्रकल्पाविषयी संशय व्यक्त करण्यात येत आहे, ज्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर होत आहे.
26 डिसेंबर रोजी सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी नयन गोयल यांना या गैरसमजांचा प्रत्यक्ष अनुभव आला. पालक आपल्या मुलांना शाळेतून घरी घेऊन जाण्यासाठी तक्रारी करीत आहेत, तर काही पालकांनी शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात ‘अपार आयडी’ प्रकल्पाविषयी चुकीची माहिती पसरत आहे. काही पालकांचा असा समज आहे की, या आयडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर परस्पर लसीकरण करण्यात येणार आहे किंवा त्यांच्या माहितीचा गैरवापर होऊ शकतो. यामुळे पालक शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचे अपार आयडी काढू नयेत, अशी लेखी मागणी करीत आहेत.
या लेखी अर्जांमध्ये पालकांनी स्पष्ट नमूद केले आहे की, विद्यार्थ्यांना कोणतीही लस न देता त्यांचा डेटा सुरक्षित ठेवण्यात यावा. पालकांच्या या मागण्यांमुळे शिक्षकांवरही दबाव येत असून, शाळांमधील वातावरण तणावपूर्ण झाले आहे.
*प्रकल्प अधिकाऱ्यांचे आवाहनही निष्फळ; पालक ठाम*
‘अपार आयडी’ प्रकल्पाबाबत विद्यार्थ्यांना लस दिली जाणार असल्याच्या अफवांनी तालुक्यात गोंधळाचे वातावरण निर्माण केले आहे. या पार्श्वभूमीवर सहायक जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी नयन गोयल यांनी या अफवांवर स्पष्टपणे भूमिका मांडत पालकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितले की, “अपार आयडी प्रकल्प हा विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी असून, त्यांचा डेटा सुरक्षित ठेवला जाईल. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये,” असे आवाहन त्यांनी वारंवार केले.
गोंधळ दूर करण्यासाठी आणि पालकांची समजूत काढण्यासाठी नयन गोयल यांनी 26 डिसेंबर रोजी गेदा आश्रमशाळेला भेट दिली. त्यांनी उपस्थित पालकांशी संवाद साधत प्रकल्पाचे खरे उद्दिष्ट समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, पालक ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. त्यांच्या मनातील भीती आणि संशय इतके प्रबळ होते की, त्यांनी कोणतीही माहिती स्वीकारण्यास नकार दिला. “आम्हाला फक्त आमची मुलं घरी न्यायची आहेत,” असे म्हणत त्यांनी मुलांना शाळेतून घरी नेण्यावर ठाम भूमिका घेतली.
प्रकल्प अधिकाऱ्यांच्या संवादाच्या प्रयत्नांनंतरही पालकांच्या भूमिकेत कोणताही बदल झाला नाही, उलट अफवांमुळे त्यांचा प्रशासनावरचा विश्वास कमी झाल्याचे दिसून आले.
*तालुक्यातील आश्रमशाळा रिकाम्या होण्याच्या वाटेवर*
अफवांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. गेदा येथील आदिवासी आश्रमशाळेत एकूण 404 विद्यार्थ्यांपैकी केवळ 55 विद्यार्थी शिल्लक राहिले आहेत. पद्देवाही येथे 379 विद्यार्थ्यांपैकी 190 विद्यार्थीच आता उपस्थित आहेत, तर हेडरी आश्रमशाळेत 375 पैकी केवळ 130 विद्यार्थी शाळेत आहेत. बुर्गी, कोठमी आणि उडेरा येथील खासगी आश्रमशाळांमध्येही परिस्थिती यातून वेगळी नाही.
विशेष म्हणजे, एटापल्ली आश्रमशाळा मात्र अद्याप या लाटेतून अप्रभावित राहिली आहे. तिथून एकही विद्यार्थी घरी गेलेला नाही. तथापि, अफवांमुळे निर्माण झालेली भीती आणि विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यात येणाऱ्या मर्यादा यामुळे आश्रमशाळांचे शिक्षक दुहेरी कोंडीत सापडले आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत ठेवण्यासाठी शिक्षकांना अधिक प्रयत्न करावे लागत असून, अफवांवर विश्वास न ठेवण्यासाठी पालकांना सतत समजवावे लागत आहे.
_शाळांमध्ये कुठलीही लसीकरणाची मोहीम सुरू नाही. त्यामुळे पालकांनी गैरसमज दूर करावे. आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत याबद्दल जनजागृती करणार आहे._
– *डॉ. सचिन कन्नाके, तालुका आरोग्य अधिकारी, एटापल्ली*
_पालकांना शाळेतील सर्व शिक्षक मी समजावून सांगितले आहे; परंतु पालक ऐकत नाही. सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांची बैठकीत या विषयावर चर्चा करण्यात आली. मुख्याधापक इलाका ग्रामसभेला उपस्थित राहून या विषयांवर पालकासोबत चर्चा करणार आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आहे-_
*एफ. एम. अलोने, प्राथमिक मुख्याध्यापक, विनोबा आश्रमशाळा, गेदा*