सोलापूर:- गणेशोत्सव काळात स्वेच्छेने दिलेली वर्गणी घ्या, जबरदस्तीने वर्गणी मागू नका, मंडपासाठी सार्वजनिक रस्त्याचा दोन तृतीयांश भाग मोकळा सोडावा, पारंपारिक वाद्यांचा वापर करावा, इतर धर्मियांच्या भावना दुखावणार नाहीत, याची खबरदारी घ्या, कोणतीही अफवा पसरवू नये, नियमांचे पालन करून उत्सव साजरा करावा, अशा सूचना पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी सर्व गणेशोत्सव मंडळांना केल्या आहेत.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने गुरुवारी (ता. २९) पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्तालयात शांतता समितीची बैठक पार पडली. यावेळी गणेशोत्सव मध्यवर्ती व सार्वजनिक जयंती उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह पोलिस उपायुक्त अजित बोराडे, डॉ. दीपाली काळे, विजय कबाडे, सहायक पोलिस आयुक्त राजन माने, यशवंत गवारी, महापालिकेचे मच्छिंद्र घोलप, जिल्हाधिकारी कार्यालयाचे शशिकांत पाटील, आरटीओचे संदीप शिंदे, महावितरणचे राजेश परदेशी, भारत व्हनमाने, धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे दत्तात्रय धायगुडे, मुख्य अग्निशामक राकेश साळुंके, उपप्रादेशिक ध्वनी प्रदूषण मंडळाचे किरण चव्हाण आदी उपस्थित होते. याप्रसंगी २०२३ मधील गणेशोत्सवात समाजाभिमुख देखावे, वृक्षारोपण, व्याख्यान, आरोग्य शिबिर, डीजेमुक्त मिरवणूक, पारंपारिक वाद्य, रक्तदान असे सामाजिक उपक्रम घेणाऱ्या आठ मंडळांचा गौरव करण्यात आला.
त्यात मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळात पहिला क्रमांक श्री श्रद्धानंद समर्थ सार्वजनिक मानाचा आजोबा गणपती, द्वितीय क्रमांक लोकमान्य गणेशोत्सव मध्यवर्ती मंडळातील पहिला क्रमांक गवळी वस्ती तालीम संघ (दमाणी नगर), लष्कर विभाग मध्यवर्ती मंडळातील नवशक्ती तरुण मंडळ (बापूजी नगर), विजयपूर रोड मध्यवर्ती मंडळातील ओम गर्जना युवाशक्ती व सांस्कृतिक गणेश मंडळ, होटगी रोड मध्यवर्ती मंडळातील श्री मित्र गणेशोत्सव मंडळ, पूर्व विभाग मध्यवर्ती मंडळातील नेताजी नगर तरुण मंडळ (जोडभावी पेठ), विडी घरकूल मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातील श्री गणेश मित्र मंडळ एच ग्रुप (जुना विडी घरकूल) आणि निलम नगर मध्यवर्ती मंडळातील मानाचा श्री शिवगणेश तरुण मंडळ (निलम नगर) या मंडळांचा समावेश आहे.
*मंडळांना ऑनलाइन, ऑफलाइन परवाना*
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पोलिस ठाण्यातून ऑनलाइन- ऑफलाइन पद्धतीने परवानगी घेणे आवश्यक आहे. ऑनलाइन किंवा ऑफलाइन नोंदणीसाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे सर्व मंडळांनी पालन करावे, असेही आवाहन पोलिस आयुक्तांनी केले आहे.
*मंडळांना ‘या’ दिल्या सूचना…*
सर्वोच्च न्यायालयाचे ध्वनी प्रदूषणाच्या अनुषंगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे
१) मंडळांनी ‘महावितरण’कडून अधिकृत विद्युत जोडणी घ्यावी, मंडपात शॉर्टसर्किट होऊन इजा अथवा धोका होणार नाही, याची दक्षता घ्यावी
२) मिरवणुकीत मोठे व लांब कंटेनर वापरू नये, त्या वाहनांना आरटीओकडील परवानी हवी
३) मिरवणूक संवेदनशील ठिकाणी जास्त रेंगाळत ठेवू नये, मिरवणुकीवेळी ट्रिपल सीट फिरू नका
४) सर्व गणेशोत्सव मंडळांनी आपापल्या मंडपात सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था करावी