दारव्हा तालुकास्तरीय कला, क्रीडा, कबबुलबुल महोत्सवाचे रामगाव (रामे) येथे आयोजन.
जया लाभसेटवार
जिल्हा प्रतिनिधी
यवतमाळ.
यवतमाळ:- जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्राला पुढे नेण्यासाठी माझी सातत्याची भूमिका राहिली आहे. त्यामुळेच जिल्ह्यात मॉडेल शाळेसारखा उपक्रम आपण राबवित आहे. राज्यातील हा पहिलाच उपक्रम आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.
दारव्हा तालुकास्तरीय कला, क्रीडा, कबबुलबुल महोत्सवाचे आयोजन तालुक्यातील रामगाव (रामे) येथे करण्यात आले. महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष कालिंदा पवार, सरपंच उन्नती राऊत, तहसीलदार रवींद्र काळे, गटविकास अधिकारी बाळासाहेब रायबोले, गटशिक्षणाधिकारी विलास जाधव, कृषी अधिकारी राजीव शिंदे, शाळा समिती अध्यक्ष शेख नब्बू शेख बन्नू, सदस्य यशवंत पवार,पोषण अधीक्षक वंदना नाईक, शिक्षण विस्तार अधिकारी क्रांती खेडकर आदी उपस्थित होते.
खासगी शाळांमध्ये भरमसाठ शुल्क आकारले जाते. त्यामुळे या शाळांमध्ये शिक्षणाचा फार मोठा बोझा पालकांवर पडतो. त्यामुळे शासकीय शाळेमध्ये चांगले शिक्षण उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्यात आपण मॉडेल स्कूल संकल्पना राबवित आहे. सध्या 200 विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा आपण घेतल्या आहेत. या शाळांसह जिल्ह्यातील इतरही शाळांमध्ये पाणी, जिम, खेळाचे साहित्य, संगणक उपलब्ध करून दिले जात आहे. मुलांना सर्व प्रकारे उत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न आहे, असे पालकमंत्री यावेळी म्हणाले.
लहान स्पर्धांमधूनच मोठे खेळाडू तयार होत असतात. त्यामुळे मुळे या केवळ तालुकास्तरीय स्पर्धा नाहीत, तर मुले घडविणाऱ्या स्पर्धा आहेत. कला, क्रीडा महोत्सव विद्यार्थ्यांना घडवितात. यश, अपयशाचा विचार न करता विद्यार्थ्यांनी जिंकण्याच्या जिद्दीने खेळण्याचा प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. स्काऊट गाइड देशभक्ती, अनुशासन, सेवा भावना शिकविते. त्यामुळे कबबुलबुल मेळावे देखील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहेत. शाळा शिक्षणाचे केंद्र आहे, सोबतच ते विविध प्रयोगाचे केंद्र झाले पाहिजे. तालुकास्तरीय महोत्सवाच्या आयोजनासाठी निधी वाढविण्याचा प्रयत्न करु, असे पुढे बोलताना पालकमंत्री म्हणाले. यावेळी शाळा समिती सदस्य यशवंत पवार यांनी देखील मनोगत व्यक्त केले. उद्घाटनानंतर क्रीडा ध्वजरोहण व मशाल प्रज्वलित करण्यात आली. कबबुलबुलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने पालकमंत्र्यांचे स्वागत केले. पालकमंत्र्यांना हस्ते सत्कार देखील करण्यात आला. खेळ व कला संवर्धन मंडळ, शिक्षण विभाग, पंचायत समिती वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.