गडचिरोली जिल्ह्यातील घरकुल योजनेच्या अनुदानात वाढ करा
मार्कंडा कंन्सोबा येथील माजी ग्रापं. सदस्य भास्कर फरकडे यांची मागणी
गडचिरोली : शासनाकडून दिल्या जाणाऱ्या घरकुल योजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान तोकडे पडत असून या अनुदानात वाढ करावी अशी मागणी मार्कंडा (कंन्सोबा) ग्रामपंचायतचे माजी सदस्य भास्कर फरकडे एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे नुकतीच केली आहे. प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकूल योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना व इतर घरकुल योजनेमध्ये घर बांधकामासाठी अनुदानाची रक्कम १ लाख ४० हजार आहे. या रकमेमध्ये घरकुल बांधकाम पूर्णत्वास जात नाही. त्यामुळे अनेक घरकुल अपूर्ण राहत आहेत. सद्यस्थितीत घर बांधकामासाठी लागणारे वाळू, गिट्टी, सिमेंट, लोहा व बांधकाम मजूर याचे दर वाढलेले आहेत. शासनाने दिलेल्या अनुदानाच्या रकमेत घराचे बांधकाम पूर्ण होत नसल्याने सर्वसामान्यांच हक्काच्या घराचे स्वप्न अधुरे राहत आहे. तरी घर बांधकामासाठी शासनाने अनुदानात वाढ करून ५ लाख रुपयांपर्यंत करावे अशी मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य भास्कर फरकडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.