धानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी
अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाची मागणी
गडचिरोली- धानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टी मुले प्रचंड नुकसान झाले असून तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष तालुका धानोराने केली आहे.
पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी धानोरा तहसीलदार यांची भेट घेऊन याबाबतचे सविस्तर निवेदन त्यांना सादर केले व मागण्यांबाबत चर्चा केली. २०२५-२५ हंगामात आदिवासी विकास महामंडळ तर्फे खरेदी करण्यात आलेल्या धनाची त्वरित उचल करण्यात यावी, या यावर्षीचे खरेदी केंद्र त्वरित सुरु करण्यात यावे, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
विद्युत विभागातर्फे लावण्यात येत असलेले नवीन विद्युत मीटर सर्वसामान्य जनतेला न परवडणारे असल्याने हे मीटर लावणे ताबडतोब बंद करून जुनेच मीटर ठेवावे, यावर्षीची दुष्काळी परिस्थिती पाहता दहावी बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे सर्व शुल्क माफ करण्यात यावे, प्रलंबित वनहक्क दावे त्वरित मंजूर करून त्या जमिनीचे पट्टे त्वरित देण्यात यावे व शेतकऱ्यांना प्रोत्साहन रक्कम त्वरित अदा करण्यात यावी अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली.
या शिष्टमंडळात रिपब्लिकन पक्षाचे राज्य उपाध्यक्ष कुलपती मेश्राम, तालुका अध्यक्षरमेश बारसागडे, जिल्हा उपाध्यक्ष, दुर्योधन सहारे, तालुका सचिवभानुदास बांबोळे, तालुका उपाध्यक्ष महेंद्र पदा इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते
