मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक.
मुंबई:- शालेय शिक्षण विभागाच्या आगामी १०० दिवसांचा कामाचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. राज्यातील शिक्षकांमध्ये प्रचंड गुणवत्ता असून त्यांना प्रोत्साहन देऊन चांगले परिवर्तन घडू शकते. या बळावर महाराष्ट्र शालेय शिक्षणात आघाडीवर ठेवण्याचे उद्दीष्ट्य ठेवा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांना संविधानिक मूल्ये शिकविण्यावर भर द्यावा. शिक्षक आणि विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणारी माहिती डिजिटल स्वरूपात एकत्र करा, सायकल वाटप योजनेमुळे विद्यार्थिंनी शाळेत येत असल्याने ही योजना सुरू ठेवा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
शासनाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. त्यांना घडविणारे उत्कृष्ट शिक्षक ही मोठी संपत्ती आहे, त्यांचा इतरांसाठी आदर्श म्हणून उपयोग करा. विद्यार्थ्यांच्या शाळेतील पहिल्या दिवसाचे स्वागत करा. यासाठी सर्व मंत्री, सचिव यांच्यासह मान्यवरांना पहिल्या दिवशी शाळेत जाण्यासाठी सूचित करा. समूह शाळा ही अतिशय महत्त्वपूर्ण आणि आवश्यक बाब आहे. तथापि, कमी संख्या असणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांना समूह शाळांमुळे होणारे लाभ योग्य प्रकारे समजावून सांगा, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
सह्याद्री अतिथिगृह येथे झालेल्या या बैठकीस शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, पणन मंत्री जयकुमार रावल, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मेघना बोर्डीकर साकोरे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव आदी यावेळी उपस्थित होते.
आढावा बैठकीत घेतलेले ठळक मुद्दे :
१) राज्यगीत सर्व शाळांमध्ये सक्तीचे तसेच मराठी भाषेची प्रभावी अंमलबजावणी करणार.
२) राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील संरचना लागू करण्यासाठी सर्व शाळा/ अंगणवाडी केंद्रांचे जिओ टॅगिंग करून छायाचित्रांसह मॅप करणार.
३) राज्य अभ्यासक्रम आराखडा 2025-26 पासून लागू करणार.
४) पीएम श्री शाळा योजनेच्या धर्तीवर प्रत्येक क्लस्टरमधून एका शाळेचा सीएम श्री शाळा म्हणून विकास करणार.
५) सर्व विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकांची वैधता तपासणार.
६) शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना करून बळकटीकरण करणार.
७) शिक्षक भरती प्रक्रिया जलदगतीने राबविणार.