
गडचिरोली:- जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील धान बोनस वाटपात कोट्यवधी रुपयांचा कथित घोटाळा उघडकीस आला आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी चामोर्शी खरेदी-विक्री संघाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना दिले आहेत.
उपविभागीय अधिकारी गडचिरोली यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीच्या अहवालात बोनस वाटपात प्रथमदर्शनी अनियमितता आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. यामुळे संबंधित पदाधिकाऱ्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. तसेच, या प्रकरणात वारंवार तक्रारी मिळूनही कारवाई न करणाऱ्या जिल्हा मार्केटिंग अधिकारी विश्वनाथ तिवाडे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांना नोटीस बजावून खुलासा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
बोनस वाटपातील भ्रष्टाचार उगड.
गेल्या काही वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात धान खरेदी, भरडाई घोटाळा आणि तांदूळ तस्करीमुळे शासनाला कोट्यवधींचा फटका बसला आहे. यात आता धान उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या बोनस वाटपातील भ्रष्टाचाराचा नवा प्रकार समोर आला आहे. चामोर्शी तालुका खरेदी-विक्री संघाने भूमिहीन व्यक्तींच्या नावे खोटी शेती दाखवून त्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी 40 हजार रुपये जमा केले. यानंतर संबंधित व्यक्तींना फक्त दोन ते तीन हजार रुपये उर्वरित रक्कम इतरत्र वळवण्यात आल्याचा आरोप आहे. या बोगस लाभार्थ्यांची यादीच तक्रारीत सादर करण्यात आली होती.
भाजप सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष आशिष पिपरे यांनी या घोटाळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दस्तऐवज सादर करून चौकशीची मागणी केली होती. पिपरे यांनी तक्रारीत नमूद केल्यानुसार, बोगस लाभार्थ्यांच्या खात्यांची तपासणी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना वारंवार तक्रारी करूनही कोणतीही कारवाई झाली नव्हती, ज्यामुळे संशय अधिक गडद झाला.
चौकशी समितीचा अहवाल.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत उपविभागीय अधिकारी गडचिरोली यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली. समितीने आपल्या अहवालात धान बोनस वाटपात अनियमितता झाल्याचे प्रथमदर्शनी नमूद केले. या अहवालाच्या आधारे जिल्हाधिकाऱ्यांनी चामोर्शी खरेदी-विक्री संघाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. यासोबतच, जिल्हा मार्केटिंग अधिकारी विश्वनाथ तिवाडे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावून खुलासा मागितला आहे. विशेष म्हणजे, तक्रारीत तिवाडे यांचाही या घोटाळ्यात सहभाग असल्याचा आरोप आहे.
जिल्हा मार्केटिंग अधिकारी विश्वनाथ तिवाडे येणार अडचणीत.
जिल्हा मार्केटिंग अधिकारी विश्वनाथ तिवाडे यांनी तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याने त्यांची अडचण वाढली आहे. त्यांच्या या निष्क्रियतेमुळे घोटाळ्याला खतपाणी मिळाल्याचा आरोप आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना नोटीस बजावून खुलासा सादर करण्यास सांगितले असून, याप्रकरणात त्यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे.
चामोर्शी खरेदी-विक्री संघाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे जिल्हाधिकाऱ्याचे निर्देश.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी यासंदर्भात स्पष्ट भूमिका घेतली आहे. ते म्हणाले, “चौकशी समितीच्या अहवालानुसार धान बोनस वाटपात प्राथमिकदृष्ट्या अनियमितता झाल्याचे दिसून येते. त्यानुसार चामोर्शी खरेदी-विक्री संघाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप.
या घोटाळ्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे. शेतकऱ्यांना मिळणारा बोनस हा त्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी महत्त्वाचा असतो. मात्र, या योजनेत झालेल्या भ्रष्टाचारामुळे शेतकऱ्यांचा विश्वास डळमळीत झाला आहे. स्थानिक शेतकरी संघटनांनी या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली आहे.