
भास्कर फरकडे यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती घरीच केली साजरी
चामोर्शी : महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा सोहळा एखाद्या सणाप्रमाणे आपल्या घरात थाटामाटात साजरा करण्याची परंपरा चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा कंन्सोबा येथील माजी ग्रामपंचायत सदस्य भास्कर फरकडे या इसमाने जोपासली आहे. यंदा त्यांनी आपल्या राहत्या घरी शिवजयंती साजरी केली.
‘शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात’ ही संकल्पना गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातील घराघरांत रूजते आहे. याच धर्तीवर आपणही राजांची जयंती दणक्यात साजरी करावी या हेतूने भास्करने दोन वर्षांपूर्वी तिथीनुसार आपल्या घरीच शिवजयंती सोहळा आयोजित केला. यंदा या सोहळ्याचे तिसरे वर्ष होते. ही संकल्पना हळूहळू महाराष्ट्रातील प्रत्येक घरात उत्साहाने साजरी व्हावी यासाठी हा एक छोटा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया भास्कर फरकडे यांनी दिली.