ज्योतिषी अशोक खरात प्रकरण; महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची मुंबईतील पोलीस मुख्यालयात घेतली भेट.
मुंबई:- ज्योतिषी अशोक खरात प्रकरणात नाव आल्यामुळं महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर सातत्यानं विरोधकांकडून आणि सत्ताधारी पक्षातील काही नेतेमंडळींकडून राजीनाम्यासाठी दबाव वाढत आहे. यापार्श्वभूमीवर चाकणकर यांनी काही वेळापूर्वी राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची मुंबईतील पोलीस मुख्यालयात जाऊन भेट घेतली. या भेटीवेळी चाकणकर आणि डीजीपी दाते यांच्यामध्ये या प्रकरणावर चर्चा झाली.
महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. खरात प्रकरणात कारवाई संदर्भात त्यांनी पोलीस महासंचालकांची भेट घेतल्याचं म्हटलं आहे. या कारवाईसाठी त्यांनी अधिकृत पत्र पोलीस महासंचालक सदानंद दाते यांना दिलं. यात त्यांनी नाशिक येथील स्वयंघोषीत ज्योतिषी अशोख खरात यानं एका ३५ वर्षीय महिलेवर तीन वर्षांपासून वारंवार अत्याचार करत धमकावल्याच्या घटनेचा उल्लेख करत त्याला अटक झाली असून त्याच्याकडून ५८ हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ आढळल्याची माहिती प्रसारमाध्यमांमधून प्राप्त झाल्याचं म्हटलं आहे.
तसंच महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून या प्रकरणाची अत्यंत गांभीर्यानं दखल घेतली असून आयोगाच्यावतीनं या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याचे करावी, ५८ व्हिडिओतील महिलांची ओळख गुप्त ठेवून त्यांना तक्रार देण्यासाठी विश्वासात घेऊन आवश्यक संरक्षण पुरवण्यात यावे, जर आरोपीनं डिजिटल पुरावे (व्हिडिओ) ब्लॅकमेलिंगसाठी वापरले असतील तर त्यावर IT Act अंतर्गत वाढीव कलमे लावून कडक कारवाई करावी, तसंच या प्रकरणाचा तपास कालमर्यादेत पूर्ण करुन लवकरात लवकर दोषारोपपत्र कोर्टात सादर करावं, ज्यामुळं पीडित महिलांना न्याय मिळेल. तसंच या प्रकरणाच्या तपासाचा प्रगती अहवाल वेळोवेळी महिला आयोगाकडं सादर कारावा अशा सूचना नाशिक पोलीस आयुक्तांना द्याव्यात अशी विनंती रुपाली चाकणकर यांनी पोलीस महासंचालक यांना भेटीदरम्यान केली आहे.
