ज्योतिषी अशोक खरात प्रकरण भोवले; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे सोपवला राजीनामा.
मुंबई:- नाशिकमधील ज्योतिषी अशोक खरात याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाला आता मोठे राजकीय वळण लागले असून, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा खरातची पाद्यपूजा करतानाचा व्हिडिओ आणि त्याच्यासोबतचे काही फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. या गंभीर प्रकारामुळे चाकणकर यांच्यावर चोहोबाजूंनी टीकेची झोड उठली होती. तसेच विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची आग्रही मागणी लावून धरली होती. अखेर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन चाकणकरांनी राजीनामा दिला असल्याचे समोर आले आहे. तसेच वैयक्तिक कारणाने राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी नुकतीच पुणे डीजींची भेट घेतली होती. तसेच सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी जाण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी वर्षा बंगल्यावर भेट घेतली होती. त्यानंतर रात्री उशिरा चाकणकर यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली व या भेटीत त्यांनी राजीनामा दिला आहे.
दरम्यान, नाशिक येथील भोंदूगिरी आणि महिला शोषणाच्या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने या प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेतली असून, आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकामार्फत या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे. या पार्श्वभूमीवर, सरकार चाकणकर यांच्यावर नेमकी काय कारवाई करणार किंवा त्यांचा राजीनामा घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर अत्यंत आक्रमक निशाणा साधत त्यांच्या तातडीने अटकेची मागणी केली आहे. चाकणकर यांची ‘नार्को टेस्ट’ करण्यात यावी, अशी मागणी करत त्यांनी अशोक खरात आणि चाकणकर यांचे काही व्यावसायिक संबंध होते का, याचाही सखोल तपास करण्याची विनंती केली आहे. अंधारे यांच्या या भूमिकेमुळे या प्रकरणातील राजकीय संघर्ष अधिकच तीव्र झाला असून, आगामी काळात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
