
नाशिक:-रोजंदारी वर्ग ३ वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांनी आदिवासी आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले असून, शुक्रवारी दुपारी महिला आंदोलकांनी आक्रमक होत बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस प्रशासनाने सावध पवित्रा – घेत वेळीच बॅरिकेड्स रोखून धरल्याने अनर्थ टळला.
काही वेळाने महिला आंदोलकांनी शांत होत पुन्हा ठिय्या – आंदोलन सुरू केले. दरम्यान, जोपर्यंत आम्हाला पदस्थापनेबाबत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे.शुक्रवारी खासदार भास्कर भगरे आणि वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी आदिवासी आयुक्त लीना बनसोड यांच्याशी चर्चा करून आंदोलनाचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, चर्चा निष्फळ ठरली. आंदोलकही आपल्या निर्णयावर ठाम आहेत.
तीन दिवसांपासून पोलीस तैनात
बुधवारी (दि. ९) रोजंदारी कर्मचार्यांचे आंदोलन सुरु झाल्यानंतर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनीही मोठा फौजफाटा आंदोलनस्थळी तैनात केला आहे. दरम्यान तीन दिवसांपासून आंदोलन सुरु असल्याने पोलीस कर्मचारीही आंदोलकांच्या मागे सुरक्षेच्या कारणास्तव उभे आहेत. भर पावसातही पोलीस प्रशासन आंदोलनस्थळी उपस्थित असल्याने पोलीस प्रशासनाचेही हाल होत आहेत. शुक्रवारी आदिवासी आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर वाहतुककोंडी निर्माण झाली. मात्र, पोलिसांनी वाहनांना जागा मोकळी करुन देत कोंडी सोडविण्याचा प्रयत्न केला.