
अहिल्यानगर:- आदिवासी समाजाच्या प्रश्नासंदर्भात सरकार सकारात्मक आहे. पर्यावरण रक्षणाचे जल, जंगल, जमीन संरक्षणाचे काम आदिवासी समाजानेच केले आहे, असे सांगतानाच आदिवासी समाजाच्या ताटातले काढून दुसऱ्याला देण्याचे काम सरकार कधीही करणार नाही, असे सांगत आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.शिवसेनेच्या (शिंदे गट) वतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने शेतकरी मेळाव्याचे अकोले (अहिल्यानगर) आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. मेळाव्याचे अध्यक्षस्थानी शिर्डी संस्थानचे माजी विश्वस्त डॉ. जालिंदर भोर होते. आमदार अमोल खताळ व आमदार विठ्ठलराव लंघे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
पदे येतात, जातात, पुन्हा येतात पण ‘लाडका भाऊ’ म्हणून मला जी ओळख मिळाली ते सर्वांत मोठे पद आहे, असे सांगून उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, कोणी कितीही अफवा पसरवल्या तरी लाडकी बहीण योजना कदापिही बंद होणार नाही. महायुतीचे हे सरकार शब्द पाळणारे सरकार आहे. त्यामुळे दिलेली सर्व आश्वासने टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जातील. असे म्हणाले.
आदिवासी समाजाची दिशाभूल.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी ‘जागतिक आदिवासी दिना’निमित्त अहिल्यानगर जिल्ह्याच्या अकोले दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं संविधान बदलणार, आदिवासी समाजाचं आरक्षण जाणार असा फेक नॅरेटिव्ह पसरवून आदिवासी समाजाची दिशाभूल केल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला. “त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार येणार म्हणून मुख्यमंत्रीपासून सगळेच खातेवाटप करून टाकले होते. विधानसभा निवडणूक आपण जिंकणार आणि यांना (एकनाथ शिंदे) जेलमध्ये टाकू, बर्फाच्या लादीवर झोपवू हे सगळं ते बोलले. मात्र, माझ्या आदिवासी समाजातील लाडक्या बहिणींनी त्यांच्या चारी मुंड्या चित करून टाकल्या. महाविकास आघाडीला घरी पाठवून दिलं,” अशी आठवण एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना करुन दिली.