मोंथा चक्रीवादळामुळे महाराष्ट्रावर अवकाळीचे ढग, ५ नोव्हेंबरपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज.
मुंबई:- अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील हवामान बदलामुळे विदर्भासोबतच कोकण किनारपट्टीला देण्यात आलेले पावसाचे इशारे कायम आहेत. वाऱ्याचा वेग आणि खवळलेल्या समुद्राच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कोकण किनारपट्टीला दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. ५ नोव्हेंबर पर्यंत राज्यभर ढगाळ वातावरण राहून हलका ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईत गुरुवारी दिवसभर मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर शुक्रवारसह शनिवारीही मुंबईत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला.
चक्रीवादळामुळे पडतोय पाऊस.
गेल्या आठवड्यामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रामध्ये दोन कमी दाबाचे पट्टे तयार झाले होते. यामुळे महाराष्ट्रावर आर्द्रतेचे प्रमाण वाढले. यामुळे काही दिवस विजेच्या कडकडाटासह पाऊस दिसून आला. पण सध्या पडणारा पाऊस हा चक्रीवादळामुळे पडतो आहे.
बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळामध्ये रूपांतर झाले असून त्याला मोंथा चक्रीवादळ असे नाव देण्यात आलेले आहे. हे चक्रीवादळ आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीवर २८ ऑक्टोबर रोजी धडकले आहे. यामुळे बंगालच्या उपसागराची किनारपट्टी, आंध्रप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड या राज्यात आणि महाराष्ट्रात या पावसाची तीव्रता अधिक आहे.
मोथा चक्रीवादळामुळे पडत असलेल्या पावसाची तीव्रता विदर्भात सर्वांत जास्त आणि त्यानंतर मराठवाड्यात आहे. पश्चिम महाराष्ट्रात या पावसाची तीव्रता कमी असून कोकणातही मुसळधार पाऊस पडत आहे. काही दिवसांत या पावसाची तीव्रता कमी होण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.
