
पेरमिली गावात ६ फूट लांबीचा अजगर आढळला; सर्पमित्र अमरनाथ गावडे यांनी यशस्वीरीत्या केला रेस्क्यू.
पेरमिली (अहेरी ):– अहेरी तालुक्यातील पेरमिली येथील सुभाष दहागावकर यांच्या शेतात तब्बल ६ फूट लांबीचा अजगर आढळून आला. ही माहिती मिळताच स्थानिक सर्पमित्र अमरनाथ गावडे यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी प्रसंगावधान राखून अजगराचा सुरक्षित रेस्क्यू केला.
अजगर शेतातील एका झाडाजवळ आढळला होता. शेतकरी सुभाष दहागावकर यांनी तत्काळ परिस्थितीची माहिती गावातील सर्पमित्र अमरनाथ गावडे यांना दिली. गावडे यांनी योग्य ती उपकरणे घेऊन घटनास्थळी धाव घेतली आणि काळजीपूर्वक व सुरक्षित पद्धतीने अजगराला पकडले.
रेस्क्यू केल्यानंतर अजगराला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. या घटनेनंतर गावकऱ्यांनी अमरनाथ गावडे यांचे कौतुक केले. वन्यजीव संरक्षणासाठी अशा कार्यकर्त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
गावातील शेतकरी व ग्रामस्थांनी सर्प आढळल्यास त्याची हत्या न करता तत्काळ सर्पमित्रांना संपर्क साधावा, असे आवाहनही या निमित्ताने करण्यात येत आहे.