
मध्यरात्री घरात घुसून माओवाद्यांनी केली भाजप नेत्याची हत्या.
राजकीय वर्तुळात खळबळ.
छत्तीसडमध्ये माओवाद्यांनी भाजप नेत्याची गळा आवळून हत्या केली. छत्तीसडच्या बिजापूरमध्ये ही घटना घडली. माओवाद्यांनी मृतदेहाजवळ एक पत्रक ठेवत त्यामध्ये हत्येमागचं कारण सांगितलं आहे.
बीजापूर:- छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये माओवाद्यांनी भाजप नेत्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माओवाद्यांनी भाजप नेत्याची गळा आवळून हत्या केली. बीजापूर जिल्ह्यातील उसूर ब्लॉकमधील मुंजाल कांकेर येथे ही घटना उघडकीस आली आहे.
भाजप नेता सत्यम पुनेमची मध्य रात्री गळा आवळून हत्या करण्यात आली. भाजप नेत्याच्या मृतदेहाजवळ माओवादी एक पत्रक ठेवून गेले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, सत्यम पुनेम हे खबरी असल्याचा संशय माओवाद्यांना होता. ते गावात होत असलेल्या कारवायांची माहिती पोलिसांना पुरवत होते असं देखील माओवाद्यांना वाटत होते. त्यामुळेच त्यांनी भाजप नेत्याला संपवलं. या घटनेनंतर मद्देड एरिया कमिटीने त्यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. भाजप नेत्याच्या हत्येचे वृत्त कळताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
माओवाद्यांनी भाजप नेत्याच्या मृतदेहाजवळ ठेवलेल्या पत्रकात असं लिहिले आहे की, वारंवार इशारा देऊनही सुधारणा न केल्यामुळे माओवाद्यांनी भाजप नेत्याला मृत्यूची शिक्षा दिली. या मृत्यूची जबाबदारी आमच्या क्षेत्र समितीची नाही तर ब्राह्मणवादी हिंदुत्ववादी-फॅसिस्ट भाजप विष्णुदेव साय सरकारची आहे. असे पत्रकात लिहिले आहे.