
राज्यातील सर्व तालुके आणि गावांमध्ये होणार ‘फार्मर कप’ उपक्रमाची अंमलबजावणी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
राज्य शासन आणि पानी फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम.
मुंबई:- राज्यातील सर्व तालुके आणि गावांमध्ये राज्य शासन व पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘फार्मर कप’ या उपक्रमाची व्याप्ती वाढविण्यासाठी कृषी विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. राज्य शासनाची उच्चस्तरीय समिती व पाणी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने राज्यात २०२६-२७ या वर्षासाठी १५ हजार शेतकरी उत्पादक गट तयार करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे, उत्पादित शेतमालाला योग्य बाजारपेठ मिळवून देणे. शेतीमध्ये उत्पादकता वाढविणे, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन विविध पातळीवर अनेक उपाययोजना करत आहे. २३ मार्च २०२५ रोजी झालेल्या पाणी फाउंडेशनच्या वार्षिक कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्रात “सत्यमेव जयते फार्मर कप” ची घोषणा करण्यात आली. “सत्यमेव जयते फार्मर कप” या उपक्रमाला व्यापक स्वरूपात राबविण्यासाठी राज्य शासन पाणी फाउंडेशनला सहकार्य करेल. “फार्मर कप” या उपक्रमाला राज्य शासनाशी जोडल्याने कृषी क्षेत्राच्या विकासासाठी मदत होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देखील शेतकरी उत्पादक संघटना तसेच शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी अनेक ठोस पावले उचलत आहेत. विकसित महाराष्ट्र २०४७ मध्ये कृषी विकासाला अत्यंत महत्त्व देण्यात आले आहे. त्याच दृष्टीने राज्यातील हा उपक्रम देखील महत्वपूर्ण ठरेल, असे मुख्यमंत्री यांनी सांगितले.
पाणी फाउंडेशनने २०२१ पासून “सत्यमेव जयते फार्मर कप” या उपक्रमाच्या माध्यमातून ५० हजाराहून अधिक शेतकऱ्यांना शेतकरी गटात संघटित केले आहे. यापैकी जवळपास अर्धे गट महिला शेतकऱ्यांचे असल्यामुळे, हा उपक्रम महिला सक्षमीकरणासाठी एक प्रभावी व्यासपीठ ठरला आहे. सध्या, हा उपक्रम महाराष्ट्रातील ४६ तालुक्यांमध्ये आयोजित केला जातो. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे. तरीही, ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शेतीमध्ये सामूहिकीकरणासाठी लोकचळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हा आणि गावात विस्तार करण्याची क्षमता आणि गरज आहे.
फार्मर कप‘ ची अंमलबजावणी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती
राज्यात सर्व तालुके आणि गावांमध्ये ‘फार्मर कप’ या उपक्रमाचा विस्तार करण्यासाठी राज्य शासन पाणी फाउंडेशनला सहकार्य करणार आहे. राज्यभरात ‘फार्मर कप’ उपक्रमाची अंमलबजावणीसाठी कृषी विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, पाणी फाउंडेशनचे संस्थापक आमीर खान, एटीई चंद्रा फाउंडेशनचे संस्थापक अमित चंद्रा, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे परिमल सिंह, महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे (उमेद) मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर, पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ, अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, सह्याद्री फार्म्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी विलास शिंदे, मुख्यमंत्री यांचे विशेष सल्लागार डॉ. आनंद बंग, मुख्यमंत्री कार्यालयाच्या विशेष कार्यकारी अधिकारी प्रिया खान, पाणी फाउंडेशनच्या संस्थापिका किरण राव यांची या समितीमध्ये समावेश आहे. उच्चस्तरीय समिती स्थापन झाल्यानंतर ही समिती त्यांचा पहिला कृति अहवाल तीन महिन्यात सादर करेल.
उच्चस्तरीय समितीच्या कार्यकक्षा
महाराष्ट्रातील प्रत्येक गावात ‘फार्मर कप’चा विस्तार करण्यासाठी सविस्तर कार्ययोजना तयार करणे. शेतकरी सहजपणे सामूहिक शेती आणि शेतकरी उत्पादक संस्था (FPOs) स्वीकारतील यासाठी सोपी व उपयोगी कार्यपद्धती तयार करणे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि शेतीवर आधारित उद्योगांमध्ये मूल्यवर्धन घडवून आणण्यासाठी शेतकरी उत्पादक संघटनांना आवश्यक साहाय्य उपलब्ध करून देणे. हवामानाशी जुळवून घेणाऱ्या शेती पद्धतींचा अवलंब करणे. कीटकनाशके व रासायनिक खतांचा वापर कमी करणे, तसेच सेंद्रिय व नैसर्गिक शेती पद्धतींचा प्रसार करणे. शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग वाढावा यासाठी ठोस अंमलबजावणी योजना तयार करणे. ‘फार्मर कप’ अंतर्गत प्रत्येक काम निश्चित वेळेत पूर्ण होण्यासाठी वेळापत्रक आखणे. अंमलबजावणी करणाऱ्या सर्व शासकीय यंत्रणांना प्रशिक्षणासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे. योजनांच्या यशस्वीतेसाठी जबाबदाऱ्या स्पष्टपणे निश्चित करणे. विविध शासकीय विभागांमध्ये सशक्त समन्वय सुनिश्चित करणे असे असेल.