
भारताच्या विकासगाथेत महाराष्ट्राची घोडदौड!
ऑपरेशन सिंदूर’मधून भारतीय सैन्याने दाखवलेली शक्ती ही नवीन भारताची ओळख.
मुंबई:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त मंत्रालय, मुंबई येथे ध्वजारोहण केले.देशवासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या सर्वांना व भारताच्या रक्षणासाठी सज्ज असलेल्या सैनिकांना आदरांजली अर्पण केली. ‘ऑपरेशन सिंदूर’मधून भारतीय सैन्याने दाखवलेली शक्ती ही नवीन भारताची ओळख असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आणि या मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व भारतीय जवानांचे अभिनंदन केले.
स्वदेशी आणि आत्मनिर्भर भारत बनवण्याचे लक्ष्य
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताने एका दशकात 11व्या क्रमांकावरून जगातील चौथ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेपर्यंत मजल मारली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशीचे आवाहन केले आहे, त्यानुसार महाराष्ट्राला नवाचार, स्टार्टअप्स आणि टेक्नॉलॉजी यांचे केंद्र बनविण्याचे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
स्टार्टअप आणि परकीय गुंतवणूकीमध्ये महाराष्ट्र अव्वल
महाराष्ट्राच्या विकासाबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले की, देशात येणाऱ्या थेट परदेशी गुंतवणुकीपैकी 40% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात येत असून त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होते आहे. वस्तू-उत्पादन, निर्यात व स्टार्टअप्समध्ये महाराष्ट्र देशात अव्वल असून कौशल्य प्रशिक्षण आणि शिक्षणाच्या सुविधांच्या विकासामार्फत महाराष्ट्र देशाच्या विकासाचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज होत आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी कटीबद्ध सरकार
शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीजपुरवठा करण्यासाठी ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजने’अंतर्गत जगातील सर्वात मोठा डिस्ट्रिब्युटेड सोलार प्रकल्प महाराष्ट्रात राबविला जात आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर महाराष्ट्र हे 100% हरित वीज देणारे देशातील पहिले राज्य ठरेल. सिंचन वाढवण्यासाठी विविध नदीजोड प्रकल्पांमार्फत तापी आणि गोदावरीच्या खोर्यात पाणी आणण्याचे काम सुरू आहे. यासोबतच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून शेतीला हवामान बदलापासून संरक्षित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
देशाचे स्टील हब – गडचिरोली.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची कायदा सुव्यवस्था आणि गडचिरोलीला माओवादमुक्त करण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी केलेले विशेष प्रयत्न अधोरेखित केले. गडचिरोली देशातील सर्वात मोठ्या स्टील हबमध्ये रूपांतरित होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पायाभूत सुविधांमध्ये अग्रेसर
पायाभूत सुविधांच्या विकासात महामार्ग, बंदर, विमानतळ यांचे प्रकल्प गतीने सुरू आहेत. वाढवण बंदर पूर्ण झाल्यावर जगातील ‘टॉप 10’ बंदरांपैकी एक ठरणार असून, पुणे, नवी मुंबई, नागपूर, अमरावती, गडचिरोली व छत्रपती संभाजीनगर विमानतळ विकासाचे काम प्रगतीपथावर आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, शक्तिपीठ महामार्ग तून महामार्गांचे जाळे तयार करतो आहे. त्यासोबत, 1000 लोकसंख्येंपर्यंतच्या प्रत्येक गावांमध्ये काँक्रीटचा रस्ता नेण्याचा देखील निर्णय घेतला आहे. ही विकासाची गाथा अशाच प्रकारे पुढे जात राहणार आहे आणि भारताच्या विकासगाथेत महाराष्ट्र हा प्रमुख सहभागी असणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, संतांच्या मांदियाळींनी दाखवलेल्या मार्गाने आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या मार्गावर चालत आपण हे कार्य पुढे नेत राहू, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.