
आव्हानात्मक परिस्थितीमध्ये कामाची दखल घेणारे पुरस्कार आवश्यक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंबई:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे ‘महाराष्ट्र TVJA Excellence पुरस्कार सोहळा 2025′ येथे प्रमुख उपस्थिती दर्शवत इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांना पुरस्कार प्रदान केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माध्यमांना आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ संबोधत असून संविधानाने दिलेल्या अधिकारांचा योग्य प्रकारे वापर होतो किंवा नाही यावर अंकुश ठेवण्याचे काम हा स्तंभ सातत्याने करीत असतो. एकेकाळी एका अग्रलेखाने सरकार खडबडून जागे व्हायचे, अडचणीत यायचे. पण, पुढे माध्यमे बदलली, प्रिंट माध्यमाकडून इलेक्ट्रॉनिक माध्यमे, डिजिटल माध्यमे आणि सोशल मीडिया, असा प्रवास होत गेला. त्या त्या पद्धतीने त्या त्या माध्यमांची काळ व वेळेनुसार मूल्ये ठरत गेली,असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, आज पत्रकारितेसमोर, इलेक्ट्रॉनिक माध्यमांसमोर सर्वाधिक आव्हाने आहेत. अनेकदा सत्ता स्थापनेसारख्या काळात एक बातमी मिळवण्यासाठी कॅमेरामन, पत्रकार यांना 22-22 तास उभे राहावे लागते. सकाळी 6 वाजल्यापासून, गाडीच्या मागे धावणारे पत्रकार पाहायला मिळतात. यातही महिला पत्रकारांचे विशेष कौतुक वाटते, कारण त्यांना घर आणि बाहेरचे काम दोन्ही सांभाळावे लागते. बऱ्याच ठिकाणी मूलभूत सुविधांची व्यवस्था नसते, अशा स्थितीतही दिवस काढावा लागतो. अशा परिस्थितीमध्ये पुरस्कार आवश्यक ठरतात. कारण त्यामुळे कामाची दखल घेतली जाते, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. तसेच, पत्रकारांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत असते, निर्णय घेत असते. पुढील काळात पत्रकारांचे जीवन सुकर व्हावे, याकरिता आवश्यक असेल ते निर्णय आमचे सरकार निश्चित घेईल, असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री योगेश कदम, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष अभिनेते प्रशांत दामले उपस्थीत होते.
इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांना पुरस्कार प्रदान.
✅ सर्वोत्कृष्ट पत्रकार
प्रथम क्रमांक – ऋत्विक भालेकर, आज तक
द्वितीय क्रमांक – वैभव परब, एबीपी न्यूज
तृतीय क्रमांक – कृष्णात पाटील, झी 24 तास
✅ सर्वोत्कृष्ट कॅमेरामन
प्रथम क्रमांक – राजेंद्र दयाळकर, एनडीटीव्ही
द्वितीय क्रमांक – गणेश काळे, न्यूज 18 लोकमत
तृतीय क्रमांक – अरुण पेडणेकर, एनडीटीव्ही
✅ सर्वोत्कृष्ट वृत्तनिवेदक पत्रकार
प्रथम क्रमांक – विलास बडे, न्यूज 18 लोकमत
द्वितीय क्रमांक – निखिला म्हात्रे, टीव्ही 9
तृतीय क्रमांक – प्रज्ञा पोवळे, एबीपी माझा
✅ महाराष्ट्र TVJA जीवनगौरव पुरस्कार 2025
ज्येष्ठ व्हिडिओ जर्नालिस्ट दिनेश महिमाने
ज्येष्ठ व्हिडिओ जर्नालिस्ट संजीव जाधव
ज्येष्ठ पत्रकार भक्ती चपळगावकर
ज्येष्ठ संपादक राजेंद्र साठे
✅ उत्कृष्ट महिला पत्रकार
प्रथम क्रमांक प्रणाली कापसे न्यूज 18 लोकमत
द्वितीय क्रमांक मनश्री पाठक झी 24 तास
✅ सर्वोत्कृष्ट ग्रामीण पत्रकार
सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत
तुषार कोहळे, एबीपी माझा
गजानन उमाटे, टीव्ही 9 मराठी
✅ सर्वोत्कृष्ट ग्रामीण कॅमेरामन
किरण सकपाळ, इंडिया टुडे
प्रशांत मोहिते, न्यूज 18 लोकमत
लोकसभा निवडणूक 2024 कालावधीमध्ये व्हिडीओ जर्नालिस्ट वैभव कनगुटकर यांचे निधन झाले. यांच्या स्मरणार्थ झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार यांनी विशेष पुरस्कार घोषित केला. हा पुरस्कार आज तकचे पत्रकार राजू इनामदार यांना प्रदान करण्यात आला.