*कोयत्या अण्णाच्या काळया
कारनाम्याचे : एकता रंगभूमीचे ‘
थैमान ‘ नाटक
प्रा. राजकुमार मुसणे*
एकता नाट्य रंगभूमी वडसा प्रस्तुत ताजुल उके निर्मित, प्रा. धनंजय ढवळे लिखित ,मुन्नाभाई बीके दिग्दर्शित,युवाशक्ती नाट्य मंडळ आयोजित थैमान नाटकाचा प्रयोग ७ जानेवारी २०२५ ला बामणी येथे यशस्वीरित्या संपन्न झाला.
काळया धंदयाचा कारभार चालविण्यासाठी गोर-गरीब मजुरांचे शोषण करणाऱ्या व त्यांच्यावर अन्याय अत्याचाराचे थैमान घालणाऱ्या कोयत्या अण्णाच्या विरोधात गरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढे आलेल्या एका महिला इन्स्पेक्टर तेजस्विनी जगताप ची संघर्षमय कहाणी म्हणजे थैमान नाटक होय. कट कारस्थान, अत्याचार, बदल्याची भावना, गरिबी, लाचारी, न्यायासाठीचा संघर्ष म्हणजेच थैमान हे नाटक होय. चरस ,गांजा अफू सारख्या अवैद्य वाम मार्गाच्या धंदयातून अमाप संपत्ती मिळवणारा कोयत्या अण्णा आपले धंदे व्यवस्थित चालावे यासाठी दडपशाहीने मार्गात येणाऱ्यांना संपवणारा दुष्ट, दुराचारी,अत्याचारी ,खुनी आहे. शंकरला झोपडी खाली करण्यासाठी मारझोड करणारा, भवान्याच्या सुंदर बहिणीवर वाईट नजर ठेवत त्यालाही मारणारा, कोयत्या अण्णा याच मुख्य पात्राभोवती थैमान हे नाटक फिरते. त्याच्या विविध कारनाम्याने विविध घटना प्रसंगाद्वारे संघर्ष वाढत नाटय घडते.
कोयत्या अण्णाच्या बांधकामावर कामगार म्हणून काम करणाऱ्या शंकरला अपंगत्व येते. हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणाऱ्या शंकरचे आयुष्य उध्वस्त होते. देवधर यांच्या प्रयत्नाने शंकरला कामगार कल्याण निधीतून व्हींल चेअरची मदत मिळते. कुटुंबाची सर्ब जबाबदारी असणारा शंकर हाता पायाने निकामी झाल्यामुळे अठरा विश्व दारिद्र्यात जीवन जगावे लागते. गरिबीला कंटाळून शंकर व सुमन हे जोडपे आत्महत्या करण्याचा निर्णयही घेतात परंतु समाजशील देवधर त्यांना उपदेश करून आत्महत्येपासून परावृत्त करतो. छोटेसे बाळ जन्माला येतं परंतु त्या बाळाचे संगोपन करण्याची ऐपत त्यांच्याकडे नसते .त्याला पिण्यासाठी दुधाची आवश्यकता असते बाळ सारखा रडत असतो परंतु ते दूधही देऊ शकत नाहीत .अशावेळी सुमनला कोयत्या अण्णा फार्म हाऊसवर बोलवतो आणि तिची अब्रू लुटत त्याबद्दल्यात तिला एक बॉटल दूध देतो. परंतु दूध घेऊन मुलापर्यंत येईपर्यंत मूल दगावलेले असतं. कोयत्या अण्णांनी शंकरच्या कुटुंबीयांना कोणीही मदत करायची नाही अशी गावात धमकी दिल्यामुळे गावातले कोणीही त्यांना बोलत नाहीत मदतही करत नाहीत. अशावेळी मात्र सुमन स्वतः हातात खंती घेऊन दारात मुलाचे प्रेत पुरण्यासाठी खड्डा खणते. शंकर तोंडाने माती टाकतो,आठवण म्हणून त्यावर एक रोपटे लावण्याचा.बाळाच्या मृत्यूचां प्रसंग अत्यंत भावनिक व हृदयस्पर्शी असा मन हेलावणारा आहे. शंकरने केस दाखल करू नये यासाठी त्याच्यावर दबाव आणणारा बिल्डर कोयत्या अण्णा दमनशाही प्रवृत्तीचा आहे.
नाटकातील प्रमुख घटक कोयत्या अण्णाशी निगडित आहेत.तो अत्यंत प्रभावशाली आहे अवैध मार्गातून संपत्ती निर्माण करताना सर्वसामान्य गरीब कामगारांचे प्रचंड शोषण करतो त्याच्यावर अत्याचार करतो आपल्या मार्गात आड येणाऱ्यांना थेट खून करूंन संपवतो. सुमन- शंकरला घराबाहेर हाकलणारा, मारझोड करणारा , भवान्या भंडारीच्या बहिणीवर अत्याचार करणारा, आपल्याच ड्रायव्हरची हत्या करणारा, देवधरला मारणारा कोयत्या अण्णा दुष्ट प्रवृत्तीचा आहे. त्याचा अत्याचार जेव्हा वाढत जातो त्यावेळेस मात्र सतप्रवृत्तीची माणसे एकत्र येतात आणि कोणत्या अन्नाला धडा शिकवतात. प्राणघातक हल्ल्याची तक्रार देण्यासाठी व बहिणीवर अत्याचार केल्या प्रकरणात एफआयआर नोंद करण्याकरिता भवानीला सांगितलं जातं. परंतु भवानी मात्र बहिणीची इज्जत असं चव्हाट्यावर मांडून नंतर तिला कोण स्वीकारणार ? असा प्रश्न उपस्थित करतो .’जब जब इस धरती पे पाप बढते है हमारे जैसे तुफान आते है ‘असे म्हणत सुरज ला सोबत घेऊन कोयत्या अन्नावर वार करतो. तेजस्विनी कायदा हातात घेऊ नको असं म्हणताक्षणी मात्र भवानी म्हणतो ,कायदा आहे बरोबर तर मग तो शंकर किंवा तुमचे आई-वडील, भाऊ यांच्यावेळी कायदा कुठे गेला होता? तेव्हा कुठे गेला होता तुमचा कायदा ?हा त्याचा प्रश्न आजच्या भ्रष्ट व्यवस्थेला अंतर्मुख करणारा आहे.
नाटकातील गीतांमुळे प्रेक्षक तल्लीन होतात.
हिऱ्याची अंगठी रुतून बसली, चंद्रा नाव सकाळचे घेता ओटी ही लावणी,साजणी बेभान झालो ग मी,
तू साजणी माझी तू मोहिनी भरू लागली तुझी माझी प्रेम कहाणी , आला राखीचा हा सण, धुमशान अंगात आलं,ही व्यथा जीवनाची सांगू कुणा, ग्रहण लागले कसे हो माझे आयुष्याला, तर माझ्या हाताला नेतो मी तुला फुलांच्या गाडीने , मी सिंगल हाय देवा पोरगी पटू दे अशा विविध ठिकाणी प्रेक्षकांना आनंद चाखता आला. शिवाय नाटकाचे शीर्षक गीत
वैरी काळाने घाव हा घातला
सांगणारे विधात्या तू का रे रुसला, तुकडा हा काळजाचा तू काय हिरावला,
माय लेकराच्या ममतेचा संपला लडा ,बेईमान तरी कधी थांबणार हा थैमान,माणसा हा थैमान
आशयवाहक, नाटकाच्या गाभा व्यक्त करणारे आहे.
नाटकातील विनोदही वैशिष्ट्यपूर्ण आहे. जनगणमन सर्व आपले धन, झंडू बाम, अबला नारीचा तबला वाजविला, शिक्का , भजाडबोंडी, वांडरू, भोंगडादुधी पिलाऱ्या कोंबडी, फलकवणे , लुप लुप करणे ,लावडीन गोबी,जा करोना, मारंबा, करंबा लावडीन ,देवगाय, बुडीचा बाल, वारला पापड, भैताड बिलनी अशा वैशिष्ट्ये पूर्ण शब्द उच्चारणे हशा पिकतो. काशाचा बटूखनाथ भद्रावती, वनराज वेशधारीपणामुळे हास्योत्पादक प्रसंगाने विनोद निर्मिती होत प्रेक्षक खुर्चीला खिळून राहतात. येडा रे अण्णा येडा म्हणणारा,कोयत्या अण्णाचा (सिने.मुन्नाभाई बिके )विलक्षण अभिनय ,हलणाऱ्या मिशा, चेहऱ्यावरचे बोलके भाव, दक्षिणात्य लुंगीची आगळी स्टाईल प्रेक्षकांना भुरळ घालणारी आहे.कोयत्या अण्णाच्या बांधकामातील अपघातामुळे अपंगत्व आलेला शंकर (सिने सोमनाथ नागवंशी) अस्वस्थता तडफड आंगीक अभिनय, कोयत्या अन्नाचा हस्तक भवानी भंडारी (लेखाराम हुलके) पहाडी भारदस्त आवाज व विलक्षण डोके हलवण्याची आगळी शैली महत्वपूर्ण ठरली.
न्यायप्रिय, समतावादी ,प्रामाणिक, न्यायासाठी संघर्ष करणारा, मदतीसाठी धावून जाणारा , आई-वडिलांनंतर बहीण भावाचे संगोपन करणारा कुटुंबवत्सल, सहकार्यशील, बहिण भावामध्ये आशावाद निर्माण करणारा, सुमलातेपासून रोखणारा, देवी महात्म्य सांगून लढण्याचं बळ देणारा, लोकांना जागृत करणारा देवधर जगताप ( प्रा .अविनाश सहारे), किरण वर प्रेम करणारा प्रेमवीर (स्वरबहार निकेश खोबरे), अन्नाचा दिवाणजी (अरविंद वाघदरे ) यांच्या शाब्दिक कोट्या द्वारे तथा सिनेस्टार कुणाल मेश्राम यांच्या बहारदार अभिनयाने व अफलातून अशा कल्पक बुद्धीचातुर्याने निर्माण होणारा प्रसंगनिष्ठ विनोद प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारा आहे. परिस्थितीवर मात करीत पोलीस अधिकारी बनलेली व पुढे दृष्टांचा नाश व सज्जनांच्या हितासाठी धडपडणारी जखमी झाल्यावरही जिद्दीने उठत शीलाचा वेश धारण करून गुंड प्रवृत्तीच्या अन्नाचां लॅपटॉपमधील सर्व डाटा चतुराईने मिळविणारी रणरागिनी तेजस्विनी (सिने.सोनल गोखले), दारिद्र्याने खंगलेली , अगतिक, हतबल झालेली सुमन (करिष्मा भाग्यवंत ),मुलासाठीचा तिचा टाहो, आक्रंदन वाखाणण्यासारखेच. नृत्य व संगीतात निपुण, बिनधास्तवृत्तीची हरहुन्नरी कामिनी(ज्योती राऊत) , पद ,पैसा ,प्रतिष्ठेला महत्त्व देणारी अत्यंत व्यवहारी , प्रेमाला टाइमपास मानणारी किरण (स्नेहल गेडाम) , कोयत्या अणाचा भाचा काशा (सिने. कुणाल मेश्राम) विविध अफलातून युक्त्याच्या माध्यमातून अभिनय शैलीने हास्याचे फवारे उडविणारा काशा या विविध पात्रांच्या गुंफणीतून नाटककार प्रा. धनंजय ढवळे यांनी एक वेगळा विषय प्रेक्षकांसमोर ठेवला आहे. निर्माता ताजुल उके यांची सूक्ष्मदृष्टी, मुन्नाभाई बि.के.यांची कल्पकता व कलावंतांच्या कसदार अभिनयाद्वारे नाटय यशस्वी झाले .
पार्श्वगायक तथा आर्गन वादक आदेश राऊत, ऑक्टो पॅड शुभम नखाते , तबला लंकेश कामदेव त्यांची उत्तम संगीतसाथ, ध्वनी व्यवस्था, गुरुदेव डेकोरेशन
रजत आर्ट वडसाचे नेपथ्य या सर्वांच्या योगदानाने नाट्यप्रयोगात रंगत आणली.
अत्याचाराच्या विरोधात आवाज बुलंद करणाऱ्यासाठी धडपडणाऱ्याची कसोटी म्हणजेच थरारक असे थैमान नाटक होय.हा थैमान दुःखाचा, अन्यायाचा, अत्याचाराचा, बळाचा गैरवापर करणाऱ्याचा आणि सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल करणाऱ्याचा आहे. दृष्ट प्रवृत्ती कितीही बलवान असली तरी मात्र सर्वसामान्यांच्या मनामध्ये जिद्द असेल तर त्यालाही नमवू शकतो ,हा संदेश देणारे नाटक अवश्य पाहायलाच हवे असे आहे.
प्रा. राजकुमार मुसने,गडचिरोली