गडचिरोली पोलीस दलाद्वारा पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन
* पोलीस मुख्यालय गडचिरोली, उपमुख्यालय प्राणहिता, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यलय, सिरोंचा व पोलीस स्टेशन देसाईगंज येथे झालेल्या शिबिरात एकुण 1138 रक्तदात्यांनी केले रक्तदान
* रक्तदानामध्ये महिलांचा देखिल उत्स्फुर्त सहभाग
* पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या हस्ते मोबाईल हेल्थ क्लिनिक अॅम्ब्युलन्सचे लोकार्पण
दिनांक 02 जानेवारी महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन असून दिनांक 02 जानेवारी ते 08 जानेवारी पर्यंत रेझिंग डे सप्ताह साजरा केला जातो. या कालावधीत पोलीस दलाकडुन शस्त्र प्रदर्शन, स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती अभियान, रस्ता सुरक्षा रॅली, महिला सुरक्षा रॅली, सायबर अवेयरनेस इ. प्रकारच्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. या निमित्ताने आज दिनांक 05 जानेवारी 2024 रोजी गडचिरोली पोलीस दलामार्फत पोलीस दादालोरा खिडकी ‘प्रोजेक्ट उडान’ च्या माध्यमातून उपजिल्हा रुग्णालय, रक्तकेंद्र अहेरी, डॉ. हेडगेवार रक्तकेंद्र नागपूर, शालीनीताई मेघे रक्तपेढी, नागपूर व सावंगी यांच्या सहकार्याने पोलीस मुख्यालय गडचिरोली येथील पांडु आलाम सभागृहामध्ये तसेच उप-मुख्यालय प्राणहिता, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, सिरोंचा व पोलीस स्टेशन देसाईगंज येथे ‘रक्तदान शिबिराचे’ आयोजन करण्यात आले.
गडचिरोली पोलीस दलातर्फे आतापर्यंत दोन रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये 21 ऑक्टोंबर 2023 रोजी पोलीस स्मृती दिनानिमित्त 1071 व 14 जून 2024 जागतिक रक्तदाता दिनानिमित्त 560 असे एकुण 1631 रक्दात्यांनी रक्तदान केले आहे. आज आयोजित रक्तदान शिबिरामध्ये पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. श्रेणिक लोढा, पोलीस उप-अधीक्षक (अभियान) श्री. विशाल नागरगोजे, उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी श्री. अजय कोकाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी सिरोंचा श्री. संदेश नाईक, उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा श्री. रविंद्र भोसले तसेच विविध शासकिय विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचेसह गडचिरोली पोलीस दल, सिआरपीएफ, एसआरपीएफचे पोलीस अधिकारी व अंमलदार, यासोबतच पोस्टे/उप-पोस्टे/पोमकें स्तरावरुन आलेल्या नागरिकांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवुन “रक्तदान हेच श्रेष्ठदान” ही सामाजिक भावना उराशी बाळगुन एकुण 1138 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी रक्तदान शिबिरादरम्यान पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी रक्तदानाचे महत्व पटवून सांगीतले की, मानवी रक्ताला कुठलाही पर्याय नाही. ज्या समाजात आपण राहतो त्याचे ऋण फेडायची ही एक संधी रक्तदानाने आपल्याला मिळत असते. तसेच समाजाचा एक जबाबदार घटक या नात्याने आपण सर्वांनी रक्तदान करणे काळाची गरज आहे. एवढेच नव्हे तर रक्तदाता म्हणुन सहभागी होवुन आपल्या नातेवाईक व मित्र परिवाराला प्रवृत्त करण्यासाठी पुढाकार घेणेबाबत त्यांनी आवाहन केले. रक्तदान केल्याने त्या रक्ताचा उपयोग होवुन एखादया रुग्णाचा जीव वाचविल्याचे व मदत केल्याचे आपणास समाधान मिळते. यासोबतच शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, ट्रायबल वेलफेअर कम्युनिटी, जीवनआधार बहुद्देशिय संस्था, रोटरी क्लब नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोबाईल हेल्थ क्लिनिक अॅम्ब्युलन्सचे पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आले. सदर मोबाईल हेल्थ क्लिनिक अॅम्ब्युलन्स जनजागरण मेळावा तसेच आरोग्य मेळाव्यांमध्ये जाऊन दुर्गम-अतिदुर्गम भागातील नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करणार आहे व तपासणी दरम्यान ज्या नागरिकांना शस्त्रक्रियेची गरज आहे, अशा नागरिकांना सदर मोबाईल हेल्थ क्लिनिकमधून नागपूर येथे नेऊन त्यांच्या रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांना आता त्यांच्या जवळील पोस्टे/उपपोस्टे/पोमकें येथे आपल्या आरोग्याच्या तपासणीची सुविधा या मोबाईल हेल्थ क्लिनिकच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
सदर विविध ठिकाणी आयोजित रक्तदान शिबिरापैकी गडचिरोली येथे उपजिल्हा रुग्णालय रक्तकेंद्र अहेरी, शालिनीताई मेघे रक्तकेंद्र नागपूर व डॉ. हेडगेवार रक्तकेंद्र नागपूर येथील टिम, पोलीस स्टेशन देसाईगंज व पोलीस उप-मुख्यालय अहेरी (प्राणहिता) येथे डॉ. हेडगेवार रक्तकेंद्र नागपूर येथील टिम तसेच सिरोंचा येथे उपजिल्हा रुग्णालय रक्तकेंद्र अहेरी येथील टीम ने उपस्थित राहुन रक्त संकलन करण्याचे काम केले व रक्तदान शिबिराला सहकार्य केले.
या रक्तदान शिबिर कार्यक्रमप्रसंगी श्री. नीलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली, डॉ. माधुरी विके (किलनाके) जिल्हा शल्य चिकित्सक, गडचिरोली, श्री. यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (अभियान), श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. श्रेणिक लोढा, अपर पोलीस अधीक्षक अहेरी, पोलीस उप-अधीक्षक (अभियान) श्री. विशाल नागरगोजे, उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली श्री. सुरज जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी श्री. अजय कोकाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा श्री. रविंद्र भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी सिरोंचा श्री. संदेश नाईक व इतर पोलीस अधिकारी तसेच इतर पदाधिकारी डॉ. राजीव वर्भे, डॉ. प्रतिक्षा मायी, डॉ. ओबेद ओमान, श्री. अश्वीन रडके, श्री. जीवन जवंजाळ, श्री. रविंद्र वाटोळे, श्री. सुनिल मडावी हे उपस्थित होते.
या विविध ठिकाणच्या रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोस्टे/उप-पोस्टे/पोमकेंचे प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. धनंजय पाटील, पोउपनि. चंद्रकांत शेळके, पोलीस कल्याण शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. नरेन्द्र पिवाल व प्रोपागंडा व जनसंपर्क शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. शिवराज लोखंडे, पोउपनि. प्रतिक भदाणे व सर्व अंमलदार तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोलीच्या संपुर्ण टिमने अथक परिश्रम घेतले.