नगरसेवक गोव्यात पर्यटनात व्यस्त; गावात कचऱ्याचा ढीग
राकेश तेलकुंटलवार तालुका प्रतिनिधी एटापल्ली
एटापल्ली (ता. एटापल्ली) – एटापल्ली नगरपंचायतीच्या कार्यक्षमतेवर सध्या मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. गावभर पसरलेला कचरा, दुर्गंधी आणि अनियमित स्वच्छता व्यवस्थापनामुळे नागरिक त्रस्त आहेत. नगरपंचायतीकडून नियमित कचरा व्यवस्थापनासाठी कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
गावात कचऱ्याचा डोंगर, गावातील मुख्य रस्ते, बाजारपेठा, आणि रहिवासी भागांमध्ये कचऱ्याचे ढिगारे पाहायला मिळत आहेत. प्लास्टिक, अन्नकचरा, आणि इतर कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, आरोग्याच्या दृष्टीने गंभीर समस्या निर्माण झाली आहे. डास, माशा यांसारख्या कीटकांचा उपद्रव वाढला असून, डेंग्यू आणि मलेरियासारख्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे.
* नगरसेवक गोव्यात पर्यटनात व्यस्त*
गावातील परिस्थिती बिकट असतानाही, नगरसेवक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न डावलून गोव्यात पर्यटनाचा आनंद घेत असल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, “गावाला वाऱ्यावर सोडून नगरसेवक मौजमजा करत आहेत,” अशी टीका केली जात आहे.
स्थानिक नागरिकांनी यावर संताप व्यक्त केला आहे. “आम्ही वेळेवर कर भरतो, पण स्वच्छतेची जबाबदारी घेण्यासाठी कोणी तयार नाही. कचऱ्यामुळे मुलांना खेळायला जागा नाही, आणि आरोग्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे,” असे एका नागरिकाने सांगितले.
*सुधारणा कधी होणार?*
गावात कचरा व्यवस्थापन सुधारण्यासाठी तातडीने उपाययोजना होणे आवश्यक आहे. अन्यथा, स्थानिकांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे