भिकारीमुक्त शहर योजनेंतर्गत देशातील ३० शहरांमध्ये मोहिमे सुरुवात.
इंदूर(mp):– मध्य प्रदेशातील इंदूरचे लोक आता भिकाऱ्यांना भीक देण्यापूर्वी दोनदा विचार करतील. कारण त्यांची ही दया त्यांना थेट तुरुंगात पाठवू शकते. होय, रस्त्यावर भीक देणे यापुढे केवळ चांगुल पणाचे कृत्य राहणार नाही, तर तो ‘गुन्हा’ बनणार आहे. शहर स्वच्छ व भिकारीमुक्त करण्यासाठी प्रशासनाने या सूचना दिल्या आहेत. इंदूर प्रशासनाच्या म्हणण्यानुसार नवीन वर्षापासून हा नवा नियम सुरू होणार आहे. या ठिकाणी भिकाऱ्यांना भीक देणाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदवला जाणार आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालयाकडून देशातील ३० शहरं भिकारीमुक्त बनवण्यासाठी मोहिम हाती घेण्यात आली आहे. यासाठी एक पायलट प्रोजेक्ट सुरू करण्यात आला असून देशातील ३० शहरात तो राबवला जात आहे. नव्या वर्षात पहिल्या दिवसापासून निवडक ३० शहरांमध्ये भिकाऱ्यांना भीक देणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जाणार आहे. धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटन स्थळं असलेल्या शहरांचा यामध्ये समावेश आहे.
ऐतिहासिक स्थळांमध्ये इंदौरचा समावेश असून १ जानेवारी पासून शहरात भिकाऱ्यांना भीक देणाऱ्यांवर एफआयआर दाखल केली जाणार आहे. जिल्हाधिकारी आशीष सिंह यांनी सांगितलं की, इंदौरमध्ये भीक मागण्यावर बंदी घालण्याचा आदेश आधीच जारी करण्यात आला आहे.भीक मागण्या विरोधात आमची जनजागृती मोहिम डिसेंबर अखेरपर्यंत शहरात सुरू राहील. जर एखादी व्यक्ती १ जानेवारी पासून भीक देताना आढळली तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल. इंदौर मधील सर्व लोकांना आवाहन आहे की त्यांनी लोकांना भीक देऊ नये असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलंय.
प्रशासनाने गेल्या काही महिन्यात लोकांना भीक मागण्यासाठी भाग पाडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.भीक मागणाऱ्या अनेक लोकांचे पुनर्वसनही केलं असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिलीय.
इंदौरसह देशातील ३० शहरे भिकारी मुक्त बनवण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाकडून जोरदार तयारी केली जात आहे. इंदौरमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये १४ भिकाऱ्यांना पकडण्यात आलं होतं. एका महिलेकडे ७५ हजार रुपये सापडले होते. तिने फक्त १० ते १२ दिवसात इतके पैसे गोळा केले होते. शहरात काही अशी कुटुंबे आहेत जी सतत पकडल्यानंतरही पुन्हा पुन्हा भीक मागत आहेत. त्यांच्यावर करडी नजर असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
धार्मिक महत्त्व असलेल्या अयोध्या, ओंकारेशवर, कांगडा, सोमनाथ, उज्जैन, बोधगया, त्र्यंबकेश्वर, पावागढ, मुदैर आणि गुवाहाटी या शहरांमध्ये भिकारीमुक्त अभियान सुरू केलं आहे. याशिवाय पर्यटन स्थळांमध्ये जैसलमेर, तिरुवनंतपुरम, विजयवाडा, कुशीनगर, सांची, केवडिया श्रीनगर, नामसाई, खुजराहो आणि पाँडिचेरीचा समावेश आहे. तर ऐतिहासिक शहरांमध्ये वारंगल, तेजपूर, कोझिकोड, अमृतसर, उदयपूर, कटक, इंदौर, म्हैसूर, पंचकुला, शिमला आणि तेजपूर या शहरांचा समावेश आहे.