मुंबई:- यु डायस प्लस प्रणालीमधून पूर्व प्राथमिक तसेच इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे ‘अपार आयडी’ (APAAR ID) येत्या 20 नोव्हेंबरपर्यंत उपलब्ध करून देण्यात यावेत, अशा सूचना राज्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांनी द्याव्यात, असे स्पष्ट निर्देश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक आर.विमला यांनी दिले आहेत. त्यामुळे आवश्यक प्रशिक्षण घेऊन सर्व मुख्याध्यापकांना विद्यार्थ्यांपर्यंत अपार आयडी पोहोचविण्याचे काम करावे लागणार आहे.
केंद्रीय शिक्षण विभागाने देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला आभार आयडी उपलब्ध करून देण्याबाबत निर्देश दिले होते. त्या संदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. आता प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांना अपार आयडी तयार करण्याच्या अनुषंगाने आवश्यक प्रशिक्षण देण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. राज्य प्रकल्प संचालक कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या परिपत्रकानुसार अपार आयडी तयार करण्याच्या अनुषंगाने पेरेंट टीचर मीटिंग आयोजित करून शाळा स्तरावर पालकांकडून ना हरकत प्रमाणपत्र भरून घ्यावे.
अपार आयडी तयार करण्याच्या अनुषंगाने सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांना प्रशिक्षण गट स्तरावर प्रशिक्षण देण्यात यावे व दररोज त्याचा आढावा घेण्यात यावा. आभार आयडी तयार करण्यासंदर्भात दररोज विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षण संचालक व शिक्षण आयुक्त कार्यालयामार्फत आढावा घ्यावा. तसेच त्या संदर्भातील माहिती महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद कार्यालयास पाठवावी.अपार आयडी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्यानंतर सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांना सदर आयडी हा विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रावर प्रिंट करण्यासाठी कळविण्यात यावे.
माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रत्येक आठवड्याला याबाबतचा आढावा घ्यावा.ज्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना अपार आयडी तयार करून दिले नाहीत, या संदर्भातही आढावा घ्यावा आणि त्याबाबतचा अहवाल ही शिक्षण आयुक्त कार्यालयास पाठवावा, असे हे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद कार्यालयाच्या राज्य प्रकल्प संचालक आर.विमला यांनी दिले आहेत.