पालघर:- डहाणू प्रकल्पातील तलासरी तालुक्यातील गिरगांव आदिवासी आश्रम शाळेत सुरू असलेल्या प्रकारांमुळे शाळा व्यवस्थापन समितीने गंभीर आरोप करत आमदार व सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.
मुख्याध्यापकांवर आर्थिक गैरव्यवहारांसह शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. शालेय व्यवस्थापन समितीने दिलेल्या तक्रारीनुसार, मुख्याध्यापकांनी शाळेच्या निधीचा वापर समितीला न कळवता केला आहे. मागील शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षाच्या नावाने आर्थिक व्यवहार करून गैरव्यवहार केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुख्याध्यापकांकडून अध्यापन कार्यात ढिलाई दाखवली जात असून, विशेषतः 8 वी व 9 वीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या बाबतीत योग्य मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे समितीने नमूद केले आहे.
तसेच, शाळेतील एका शिक्षकाने काही विद्यार्थ्यांसोबत अत्याचारी कृत्य केल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणात मुख्याध्यापकांनी त्या शिक्षकाला अभय दिल्याचेही सांगितले जात आहे. या घृणास्पद प्रकारामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामस्थांनी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी मुख्याध्यापकांना याबाबत वारंवार सूचना दिल्या असतानाही सुधारणा होत नसल्याचे सांगण्यात आले आहे. या सर्व परिस्थितीवर मुख्याध्यापकांनी आमच्याकडून काही चुका झाल्या असतील, त्या सुधारण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सुरक्षिततेसाठी खबरदारी घेण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेतली असून, त्यांनी आमदार विनोद निकोले यांच्या सह प्रकल्प अधिकार्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी तातडीने मुख्याध्यापकांवर कारवाई करून नवीन मुख्याध्यापकाची नियुक्ती करण्याची मागणी समितीने केली आहे.