छत्तीसगड:- छत्तीसगड मधील नारायणपूर जिल्ह्यात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले आहेत. यामध्ये एका महिला नक्षलवाद्याचाही समावेश आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले की, नारायणपूरच्या अबुझमाड भागात झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले आहेत. या परिसरात मोठ्या प्रमाणात नक्षलवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांना कारवाईसाठी रवाना करण्यात आले. सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातल्यानंतर गोळीबार झाला. सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांकडून तीन ऑटोमैटिक शस्त्रेही जप्त केली आहेत.
नारायणपूरचे एसपी प्रभात कुमार यांनी या चकमकीला दुजोरा दिला आहे. बस्तरचे आयजी पी. सुंदरराज संपूर्ण चकमकीवर लक्ष ठेवून आहेत. चकमक सुरूच आहे. जवानांकडून जोरदार प्रत्युत्तराची कारवाई सुरू आहे. अवघ्या एक दिवसापूर्वी दंतेवाडा आणि विजापूर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत एकूण १२ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले होते. रविवारी आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये तीन महिला नक्षलवाद्यांचाही समावेश आहे. आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांवर 20 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
नक्षलवाद्या विरोधात एका पाठोपाठ एक यशस्वी ऑपरेशन्स.
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये नक्षलवाद्या विरुद्धचा लढा आता निर्णायक स्थितीत असल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या 2026 पर्यंत नक्षलवाद संपवण्याच्या घोषणे नंतर सुरक्षा दलांनी बस्तरच्या विविध जिल्ह्यांमध्ये नक्षलवादी संघटनांचे कंबरडे मोडण्यासाठी मोठ्या ऑपरेशन्स सुरू केल्या आहेत. बस्तरच्या नारायणपूर जिल्ह्यात एसपी प्रभात कुमार नक्षलवाद्यां विरोधात एका पाठोपाठ एक यशस्वी ऑपरेशन्स करत आहेत.